२३५ दिवसांचा ठिय्या व न्यायालयीन लढाईनंतर अखेर आंदोलकांना मिळाला दिलासा

चंद्रपूर : २ ऑक्टोबर – थकित पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील २३५ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० जवळपास कंत्राटी कामगारांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयामध्ये जवळपास तीन महिन्यापासून याबाबत सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणांमध्ये स्थगिती दिली गेली. कामगाराचे थकीत वेतन एक महिन्याच्या आत न्यायालयात जमा करण्यात यावे तसेच सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, असे आदेशसुध्दा न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाला दिल्याचा दावा आंदोलनाचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी केला आहे.
कामगारांना ज्या दिवशी पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात येईल, त्या दिवशी डेरा आंदोलन मागे घेऊ, अशी प्रतिक्रिया डेरा आंदोलनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदत देशमुख यांनी दिली. इंदिरानगर येथे राहणाऱ्या आशिष वाढई या कंत्राटी कामगारांची मागील चार दिवसांपासून वीज कापल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब अंधारात राहत आहे. अनेक कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही, भाड्याने राहणाऱ्या कामगारांच्या मागे घर मालकांचा तगादा लावला आहे. काही कामगारांचे कुटुंबातील सदस्यांचे उपचाराअभावी झालेले मृत्यू तसेच आर्थिक तणावामुळे प्रदीप खडसे त्यांची पत्नी व संगीता पाटील या तिन कामगारांचे झालेले मृत्यू आदी परिस्थिती या आंदोलनाने बघितली असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

Leave a Reply