गडचिरोलीत बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू

गडचिरोली : २ ऑक्टोबर – आष्टी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातली असून, बुधवारी (२९ सप्टेंबर) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास ईलूर पेपरमील वसाहतीतील बबीता दिलीप मंडल या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवार, १ ऑक्टोबर रोजी सदर नरभक्षक बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले. शंकर गंगाराम चिताडे (५५) रा. इल्लूर असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे, आष्टी परिसरातील नागरिकामंध्ये नरभक्षक बिबट्याप्रती दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महिनाभरातील ही पाचवी घटना आहे.
मृतक शंकर गंगाराम चिताडे हे ३0 सप्टेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास इल्लूर गावाशेजारील जंगलात गेले होते. सायंकाळी होऊन शंकर चिताडे घरी परत न आल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. मात्र रात्रीची वेळ असल्याने शंकर चिताडे यांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर सकाळी सदर जंगल परिसरात शोधमोहीम राबविली असता शंकरचा मृतदेह आढळून आला. सदर मुतक इसमाच्या मृतदेहाचे नरभक्षक बिबट्याने लचक तोडून झुडुपात नेऊन ठार केल्याचे दिसून आले. आष्टी परिसरातील मागील अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून या परिसरात नरभक्षक बिबट्याच्या मानवी हल्ल्याचे प्रमाणी कमी नसल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत सदर नरभक्षक बिबट्याला वनविभाग जेरबंद करणार नाही, तोपर्यंत मुनष्यहानी कमी होणार नाही. बिबट्याच्या सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीने अद्यापही कोणत्याही हालचाली करण्यात न आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आणखी किती निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणार, असा सवाल आष्टी परिसरातील नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

Leave a Reply