संपादकीय संवाद – भारताला जागतिक महाशक्ती बनविण्यासाठी आधी देश स्वच्छ करा

उद्या २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती. महात्माजींनी स्वच्छतेला अहमी महत्व दिले होते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधत पुन्हा एकदा स्वच्छ भारत मिशन उजागर केले आहे. त्याचे आपण सर्वानीच स्वागत करायला हवे.
स्वच्छतेला मानवी जीवनात आगळेवेगळे महत्व आहे, हे खरे मात्र भारतापुरे बोलायचे झाल्यास आम्ही जनसामान्य सार्वजनिक स्वच्छतेला काहीच महत्व देत नाही, आमची स्वछता आमच्या घरापुरती मर्यादित असते, आम्ही घरातला कचरा साफ करतो आणि बाहेर नेऊन टाकतो. त्या कचऱ्याचा उकिरडा झाला तरी आम्हाला चिंता नसते, घर स्वच्छ करतो मात्र घरासमोरचा रस्ता साफ करण्यात आम्ही धन्यता मानतो. आम्हाला घरात कुत्री पाळण्याची आवड असते, कुत्रा हा जीवित प्राणी आहे त्यामुळे त्याला नैसर्गिक विधी आलेच कुत्र्याला घसरत बांधून ठेवायचे तर तो नैसर्गिक विधी करणार हे ओघानेच आले, मग आम्ही त्या कुत्र्याला घेऊन दिवसातून दोनदा- तीनदा बाहेर फिरवून आणतो, मग हा कुत्रा रस्त्यावर प्रसंगी दुसऱ्यांच्या घरासमोर नैसर्गिक विधी करून घाण करून ठेवतो. आम्हाला त्याचे काहीच सोयरसुतक नसते. आमचे घर स्वच्छ राहिले यातच आम्ही खुश असतो .
आम्ही सरकारी कार्यालयात जातो या कार्यालयातील जिन्यांचे कापरे आणि शौचालये बघा तिथे लोकांनी पण किंवा खर्रा खाऊन थुंकुन ठेवलेले असते, जिन्यांच्या भिंतींवर या खर्र्याची नक्षी निघालेली असते, आम्हला खर्रा खाण्याचा आनंद मिळतो मात्र त्याचा इतरांना काय उपद्रव होतो याचा आम्ही कधीच विचार करत नाही. रस्त्याने जाताना आम्ही कधी केळी तर कधी संत्री विकत घेतो, रस्त्यातच संत्री किंवा संत्री किंवा केळी आम्ही सोलून खायला सुरुवात करतो त्याची सालही आम्ही रस्त्यातच फेकतो, त्या सालांवरून घसरून अपघात होईल याची आम्हाला चिंता नसते.
मुंबईच्या किंवा दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्रवासी उतरून टॅक्सीने शहरात प्रवेश करतात त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा त्यांना प्रातःविधी करणारे लोक बसलेले दिसतात, आम्ही अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करतो दररोज रात्री बारमध्ये बसून मद्यपान करण्यात पैसा उडवतो, मात्र घराजवळ शौचालय बांधत नाही, मग रस्त्याच्या काठाचा उपयोग करावा लागणे साहजिकच आहे. मात्र त्यामुळे पर्यावरणीय समस्या काय निर्माण होत असतील याचा विचारही करत नाही.
म्हणूनच उद्याच्या गांधीजयंतीच्या निमित्ताने आम्हाला आधी घर मग वस्ती, आणि नंतर देश स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा लागेल. भारताला जागतिक महाशक्ती बनविण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ भारत घडवावा लागेल, ती आजची गरज आहे.

अविनाश पाठक .

Leave a Reply