शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : १ ऑक्टोबर – अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्यापही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात राज्य सरकार उदासीन असून केवळ आपले अपयश लपवण्यासाठी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. नागपूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र, या दोन वर्षात राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी राज्य सरकारने मदतीची भूमिका न घेता केवळ उदासीनता दाखवल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. आपले अपयश झाकण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवून हे सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्या वेळी राज्यावर आलेल्या प्रत्येक संकट काळात ते शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले होते, असे देखील ते म्हणाले आहेत.

Leave a Reply