मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवारपासून होणार शाळा सुरु

नागपूर : १ ऑक्टोबर – कोरोना संसर्गामुळे सातत्याने बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. येत्या सोमवारपासून (४ ऑक्टोबर) शाळांची घंटा वाजणार आहे. शहरातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्रक जारी केले आहे. परंतु, शासनाने यासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. परंतु, याचे उल्लंघन झाल्यास साथरोग अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ चे कलम ५१ ते ६0 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार व अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे दोन्ही लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत मुख्याध्यापकांनी खातरजमा करणे आवश्यक राहील. शक्य असल्यास शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे नियमितपणे शारीरिक तापमान तपासावे. हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीक करण करावे. शक्यतो मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे. स्कूल बसमध्ये एका सीटवर एक विद्यार्थी प्रमाणे प्रवास असेल. तसेच निर्जंतुकीकणासंदर्भात शाळांनी खातरजमा करावी. जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात. वर्गखोली तसेच स्टाफरूमची बैठक व्यवस्था शारीरिक अंतर नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. वर्गात जास्तीत तास्त १५ ते २0 विद्यार्थी बसवावे. शाळेच्या दर्शनी भागावर मास्कचा वापर इत्यादीसंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे फलक लावावे. शाळेच्या अंतर्गत व बाहय़ परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फूट इतके शारीरिक अंतर राखले जाईल, याकरिता विशिष्ट चिन्ह लावावे. कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ घेण्यात येऊ नये. ताप, सर्दी, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे, उलट्या-जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी. उपिस्थतीबाबत सक्ती करू नये. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये. शाळेमध्ये परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधीक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल, अशा कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान २ वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगोदर व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण केले जाते का? याबाबतची संपूर्ण तयारी व साहित्य उपलब्धता आहे का? हे तपासण्याची जबाबदारी खासगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी, जि.प. प्राथमिक/माध्यमिक शिक्षण विभागाची राहील. तर महापालिका शाळेच्या बाबतीत महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांची असेल.

Leave a Reply