आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही – संजय राऊत

पणजी : गोव्यातील दलबदलूंना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार फटकारले आहे. गोव्यात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. युती आणि आघाडीचं राजकारण करणार नाही, असं सांगतानाच आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत. आम्ही निर्लज्जांना शक्यतो शिवसेनेत घेत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना शक्यतो आम्ही घेत नाही. निर्लज्ज राजकारणी म्हणालो. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं हे सध्या गोव्यात सुरू आहे. त्यामुळे मी हे म्हणत आहे. गोव्याला एक परंपरा आहे. गोव्यात अनेक चांगले राजकारणी झाले. पण अलिकडे गोव्याचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं आहे, असं राऊत म्हणाले.
आज एका तिकिटावर निवडून यायचं आणि लगेच निर्लज्जपणे दुसऱ्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची. हे कुठे तरी गोव्याच्या जनतेलाच थांबवावं लागेल. हे कशा पद्धतीने थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. गोव्यात वारंवार पक्षांतर करणं किती काळ चालणार?, असा सवाल त्यांनी केला.
गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले म्हणून आम्ही आलो नाही. नेहमी येतो. कमिटमेंट म्हणून आलोय. आम्ही आघाडी आणि युती टाळण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना म्हणून 22 ते 25 जागा लढणार आहोत. मजबूत सरकार हवं असेल तर गोव्याची जनता शिवसेनेला मतदान करेल. शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत निवडून पाठवतील. गोव्यात चांगलं सुशासन द्यावं ही आमची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं.
मागच्या वेळी आघाडीत निवडणूक लढवली होती. आमच्या वाट्याला तीन जागा आल्या होत्या. ज्या जागा वाट्याला आल्या त्याचा शिवसेनेशी काहीच संबंध नव्हता. तरीही आम्ही लढलो. त्यानंतर सुद्धा गोव्यात सेनेचं काम सातत्याने सुरू राहिलं. नेहमीप्रमाणे गोव्यात इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारण्याचे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहेत. या उड्या दिल्लीपर्यंत जातात. यावेळी या उड्यांची मजल पश्चिम बंगालपर्यंत गेली. अगदी कोलकात्यापर्यंत गेली. चांगलं आहे. अखंड देश आहे. कोणी कुठेही उडी मारू शकतो. त्यातून गोव्याला काय मिळणार? प्रत्येक वेळेला निवडणूक आली की नवीन नवीन पर्याय उभे राहतात. तसे नवीन पर्याय आता उभे केले जात आहेत. आनंद आहे. मात्र, शेवटी गोवेकरांच्या मनात असेल तेच होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply