संपादकीय संवाद – काँग्रेसला जुने वैभव मिळवण्यासाठी घराणेशाही सोडावी लागेल

सध्या काँग्रेस पक्षातील काही बंडखोरांनी पुन्हा एकदा पक्षाला नेतृत्वच नाही, याबाबत सोनिया गांधींना पत्र लिहून आवाज उठवला आहे. त्यात कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद असे दिग्गज आघाडीवर आहेत. या सर्वांचा रोख साहजिकच राहुल गांधींवर आहे. राहुल गांधींनी पक्षाला सक्षम असे नेतृत्व दिलेले नाही असा या सर्वांचा दावा आहे, त्यामुळे हा आवाज उठवण्याचा प्रयत्न चालू आहे.
वस्तुतः काँग्रेस नेतृत्वाने या तक्रारीची योग्य दखल घेणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही त्याचबरोबर राहुल गांधी समर्थकांनी या कथित बंडखोर नेत्यांच्या घरांसमोर जाऊन निषेधाच्या घोषणा देणे, सुरु केल्याच्या बातम्या आहेत. हे खरे असेल तर सोनिया गांधींनीच या राहुल गांधी समर्थकांना आवरायला हवे मात्र आवरले जात नाही हे स्पष्ट दिसते आहे. हे सर्व बघता आता काँग्रेसचे काही खरे नाही असे जनसामान्यांचे मत झाल्यास ते वावगे ठरू नये.
काँग्रेस हा या देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे, स्वातंत्र्य लढ्यात या पक्षाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात १९७७ पर्यंत या देशावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नंतरही ८०-९० च्या दशकात पुन्हा काँग्रेसची ताकद वाढी होती, मात्र १९९० नंतर काँग्रेसची उतरती भाजणी सुरु झाली आज तर हा पक्ष अंधारात दिवा लावून शोधावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याला प्रमुख कारण एकच आहे ते म्हणजे काँग्रेसमध्ये नेतृत्वाची नवी फळी उभी होऊ शकलेली नाही, काँग्रेसचे सर्व राजकारण नेहरू आणि गांधी या घराण्यांभोवतीच फिरते आहे. गांधी नेहरू परिवार वगळता कुणीही माईचा लाल काँग्रेसला राष्ट्रीय नेतृत्व देण्यास लायक दिसत नाही, जरी दुसरा कुणी आणला तरीही तो गुळाचा गणपती असतो. सर्व सूत्र गांधी परिवाराच्या होतीच असतात, गांधी परिवारातील आधीचे पंडित नेहरू आणि नंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी हे पक्षाला नेतृत्व देण्यास खरोखरी सक्षम होते, नंतर मात्र तसे सक्षम नेतृत्व कुणीही गांधी देऊ शकलेला नाही. त्याचाच परिणाम पक्षाला उतरती कळा लागण्यात झाला आहे, आज काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपमध्ये सक्षम नेतृत्वाची फळी असल्यामुळे भाजप वाढतच गेला, १९८४ मध्ये ज्या पक्षाचे फक्त २ खासदार होते तो पक्ष गेली ७ वर्ष देशात सत्ता राबवतो आहे, तीही स्पष्ट बहुमतासह सत्ता आहे. याला कारण पक्षाने घराणेशाहीला उत्तेजन दिलेले नाही, काँग्रेसने नेमकी तीच चूक केली आहे, त्याचाच परिणाम काँग्रेसमध्ये सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी केली जाण्यात झाला आहे. ही बंडखोरी वाढतेच आहे, परिणामी केंद्रात विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपतही खासदार निवडून येत नाही आणि ३ किंवा ४ राज्य वगळता कुठेही काँग्रेसची सत्ता नाही, काही राज्यांमध्ये एकही आमदार निवडून येत नाही अशी काँग्रेसची दयनीय अवस्था आहे.
ही अवस्था पक्षनेतृत्वाच्या लक्षात आणून दिली तर हे धाडस करणाऱ्यांच्या घरासमोर निदर्शने केली जातात, त्यांचा विरोध केला जातो. म्हणजे काँग्रेसमध्ये पक्षाची चिंता करणारी लोक नकोत तर नेहरू-गांधी परिवाराची हाजी हाजी करणारेच लोक आम्हाला हवेत असा अर्थ निश्चित काढता येतो. असेच सुरु राहिले तर पुढील १० वर्षात काँग्रेसचेही संसदेत फक्त २ खासदार दिसतील आणि एखाद्याची राज्यात काँग्रेस तडजोडीतून जरी सत्तेत आली तरी ती राष्ट्रीय बातमी होईल. हे थांबवायचे असेल तर पक्षनेतृत्वाने आजच गांभीर्याने विचार करायला हवा, उद्या कदाचित उशीर झालेला असेल .

अविनाश पाठक

Leave a Reply