संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदतीचा हाथ पुढे करावा – विजय वडेट्टीवार

नागपूर : ३० सप्टेंबर – ‘संकटाच्या काळात शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करायला हवी, ही सर्वच पक्षांची मागणी असते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाही तसा आग्रह असतो. केवळ भाजप मागणी करतोय किंवा त्यांनीच केली पाहिजे असं काही नाही,’ असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज हाणला. तसेच संकटाच्या काळात केंद्र सरकारनेही मदतीचा हात पुढे करायला हवा अशी मागणीही केली.
गेले काही दिवस राज्यात घोंगावत असलेलं गुलाब चक्रीवादळ व त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जावी, अशी विरोधकांची मागणी आहे. अशा परिस्थितीत सरकार नेमका काय निर्णय घेणार आहे, अशी विचारणा वडेट्टीवार यांना आज पत्रकारांनी केली. त्यावेळी त्यांनी सरकारची भूमिका मांडली. ‘विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे याची सरकारला कल्पना आहे. नुकसानीचा अंदाजही आला आहे. मात्र, केवळ अंदाजावर चालत नाही. उदाहरणार्थ, मराठवाड्यात १७ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पण हे नुकसान जास्तही असू शकतं. त्यासाठी पंचनाम्यांची गरज आहे. त्यातून एकूण किती लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय हे समोर येईल. एकदा का नुकसानीची जिल्हानिहाय माहिती हाती आली की सरकार योग्य निर्णय घेईल,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
नागपूर इथं ते पत्रकारांशी बोलत होते. ‘राज्य सरकार हे आपल्या परीनं शेतकऱ्यांना सर्व मदत करणारच आहे, मात्र संकटाच्या काळात केंद्र सरकारनंही मदतीचा हात पुढं करायला हवा, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply