रस्त्यावरील खड्ड्यांवरून आशिष शेलार यांचा मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा

मुंबई : ३० सप्टेंबर – पावसामुळे मुंबईसह राज्यभरात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि खड्डेमय रस्ते यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी म्हटलं, गणपतीपूर्वी, पावसाळ्यात महापौरांनी रस्त्यांची पाहणी केली असती तर त्यांना मुंबईकरांची चिंता आहे असं झालं असतं. आता त्यांची भावना ही पळता भुईथोडी आहे. मुंबईकर नव्या आजाराने ग्रस्त आहेत ते म्हणजे खड्डे. २१ हजार कोटी रस्त्यावर खर्च केले. ४८ कोटी रूपये खड्डांवर खर्च करणार आहेत ते वाढवू शकतात. पोर्टलवर ९२७ खड्डे आहेत महापौर म्हणतात ४८००० खड्डे बुजवले. खड्डे बुजवल्याचं दाखवून कंत्राटदाराला मलिदा मिळवून देण्याचा प्रकार आहे.
मुख्यमंत्र्यांनी जर राज्यभरातील विविध एजन्सीच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील जे खड्डे आहेत त्या एजन्सीजची बैठक घेतली असती. त्या कंत्राटदारावर कारवाई केली असती तर आम्हीलाही विश्वास बसला असता. ज्या पद्धतीने खड्डे बुजवले जातात त्याची चौकशी लावली असती तर आम्ही त्यांच्या हेतूवर शंका घेतली नसती. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही गेल्या काळात सुप्रिया सुळेंनी खड्डे विथ सेल्फी आंदोलना सारखे आहे. हे दिखाऊ पणासारखे आहे. आता सुप्रिया सुळे कुठे गेल्या? असा सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, गेल्या २५ वर्षातली आकडेवारी सांगतायत… गेली २४ वर्षे तुम्हीच आमच्यासोबत होते, तेव्हा तोंड का उघडलं नाही? आता असा कोणता माऊथवॉश घेतला की एवढी खळखळ करताय? आम्ही काम करतो, आरोपांचं खंडन करत बसत नाही. मुख्यमंत्री महाराष्ट्राचं संयमी नेतृत्व… मुख्यमंत्र्यांवर टिका केली तरी ते कामातून उत्तर देतात. महापौरांची पळता भुईथोडी म्हणतांना शेलार हे तरी मान्य करतात की, महापौर धावाधाव तरी करतात. शेलारांना बोलावंच लागेल, नाहीतर भातखळकर स्पर्धेला आहेतच.

Leave a Reply