दारू पिताना झालेल्या वादातून दोघांनी केला एकाचा खून

नागपूर : ३० सप्टेंबर – एकत्र दारू पित असलेल्या सोबत्यांचा आपसात वाद झाला. वाद विकोपाला गेला अन् दोघांनी मिळून तिसऱ्याला संपवले. चाकूने त्याच्या शरीरावर सपासप वार होत असताना नागरिक मदतीला धावून आले. परंतु, उपचार मिळेपर्यंत त्याचा जीव संपला होता. आकाश मातादिन मोरे (वय २२) असे मृताचे नाव आहे.
दुपारी ४ वाजताच्या सुमारास कळमना पोलिस ठाणे हद्दीत ही थरारक घटना घडली. माहितीनुसार, मृतक आकाश मोरे हा आरटीओ कार्यालयाजवळील आदिवासी प्रकाशनगर येथील रहिवासी आहे. तसेच घटनेतील आरोपी विकी, रोहित आणि त्यांचे साथीदार हेदेखील याच वस्तीतील आहेत. हे सर्व पुलाखाली दारू पित बसले होते. दारूची झिंग चढल्यानंतर आरोपींचा आकाशसोबत काही कारणावरून वाद झाला. सर्व दारूच्या नशेत असल्यामुळे लगेच वाद विकापाला गेला आणि रागाच्या भारात आरोपी विक्की आणि रोहित या दोघांनी आकाश मोरे याच्यावर चाकूने हल्ला चढवत सपासप वार केले. मारहाण होत असल्याने आकाश आरडाओरड करू लागला. त्याचा आवाज ऐकू न बाजूची मंडळी त्याच्या मदतीला धावून आली. त्यांनी आकाशला आरोपींच्या तावडीतून सोडविले. काही वेळाने आकाशला जखमी अवस्थेत उपचाराकरिता मेयोत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Reply