केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांकडे मागणी करावी – नाना पटोले

मुंबई : ३० सप्टेंबर – “मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत करावीच, त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करावी.” असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, “मे महिन्यात कोकण किनारपट्टीसह गुजरातलाही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. कोकणात या चक्रीवादळाने अपरिमित हानी केली होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला आणि बैठक घेऊन गुजरातला १ हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. महाराष्ट्रातही तौक्ते चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असताना पंतप्रधानांनी त्याची दखलही घेतली नाही, महाराष्ट्राशी केंद्र सरकारने दुजाभाव केला. त्यानंतरही राज्याने केंद्राकडे मदत मागितली परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली. आता राज्यातील भाजपा नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे, ती रास्तच आहे पण केंद्र सरकारकडे जाऊन या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. त्यासाठी भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी.”
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, परमबीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते, तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमबीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला.

Leave a Reply