कन्हैया कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशावरून संबित पात्रांची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : ३० सप्टेंबर – भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसला चिमटा काढत कन्हैय्या कुमारच्या काँग्रेस प्रवेशावरुन टीका केली आहे. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्या पक्षप्रवेशावरुन भाजपाने काँग्रेसवर टीका करण्याची संधी साधली आहे.
यावेळी एका चर्चासत्रादरम्यान बोलताना भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, “तुम्ही मला आणि सुहेलदेव सेठ यांना उगाचच बोलावलं. तुम्हाला कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद किंवा संदीप दीक्षित यांना बोलवायला हवं होतं. आमची काहीच गरज नाही. हे एकत्र बसून लाईव्ह टीव्हीवर एकमेकांची डोकी फोडतील आणि सगळं जग यांना बघेल. ते म्हणाले की, सर्व सहभागी काँग्रेस पक्षाचेच नेते हवे होते”.
संबित पात्रा म्हणतात, “कपिल सिब्बल यांचा एक प्रवक्ता असेल, एक सोनिया गांधींचा, एक राहुल गांधींचा आणि काँग्रेसच्या नॉन वर्किंग कमिटीचा एक प्रवक्ता असेल आणि मग त्यांच्यात चर्चा घडवून पाहा, कशी मजा येते. याला लोकशाही म्हणतात. आम्ही एकमेकांशी भांडून एकमेकांचं शीर कापू आणि ही लोकशाही आहे”.
छत्तीसगढचा उल्लेख करत संबित पात्रा म्हणाले, “तिथेही सगळी गडबड सुरु आहे. जर काँग्रेसने ठरवलंच आहे की ते गळफास लावून आत्महत्या करणार आहेत तर मग आपण काय करू शकतो? पण मी एवढंच म्हणू इच्छितो की काँग्रेस, तुमचे तुकडे तुकडे होतील, इंशाल्लाह-इंशाल्लाह”.

Leave a Reply