वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

खुर्चीपूजन !

खुर्चीवर जो बसे तयाची ऐका तुम्ही बात
गाढवासही वाघ झुकूनी करतो कुर्निसात !

खुर्चीवर जो बसे तयाचे नित्य करावे कूजन !
खून करूनी सात फिरावे करत खुर्चीचे पूजन !

मूर्ती बदलली खुर्चीमधली जरी कधी तरीही
खुर्चीवरची निष्ठा देऊ नये ढळू रे कधिही !

खुर्चीसाठी मित्राच्याही खुपसा पाठित खंजीर !
तरीच जग हे म्हणेल तुम्हा सच्चे खुर्चीवीर !

खुर्चीसाठी तत्वांनाही तिलांजली अर्पावी !
वचन पित्याचे वा कुठलीही पुडी सोडुनी द्यावी !

मूर्ती येते आणिक जाते मूर्ती असे अशाश्वत !
खुर्ची अविचल स्थीर रहाते तीच असे रे शाश्वत !

अशाश्वताची काय धरावी खुर्च्यार्थ्याने
आस !
खुर्ची पुजावी खुर्चीसाठी खुर्च्यार्थ्याने खास !

           कवी -- अनिल शेंडे ।

Leave a Reply