विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शहीद चौक नागपूर येथे नागपूर कराराची होळी

नागपूर : २८ सप्टेंबर – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या इतवारी परिसरातील शहीद चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली आहे. विदर्भ राज्याचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी १९५३ साली झालेल्या नागपूर कराराला आज ६८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या ६८ वर्षांच्या काळात सत्तेवर आलेल्या प्रत्येक पक्षांनी विदर्भाच्या वाट्याला येणारा विकास पश्चिम महाराष्ट्रात पळवल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. नागपूर करारांतर्गत खोटे आश्वासन देऊन इच्छा नसताना विदर्भाला महाराष्ट्रात सामील करण्यात आले, या विरोधात आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर कराराची होळी करत आंदोलन केले आहे. या ६८ वर्षांच्या काळात कधीही नागपूर कराराचे पालन झाले नाही. त्यामुळे विदर्भाचे मागासलेपण वाढतच गेले आहे. एवढंच नाही तर कोट्यवधी रुपयांचा अनुशेष तयार झाला असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे.
विकासाच्या दृष्टीने विदर्भ मागे पडत असल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नागपूरला उपराजधानीचा दर्जा देणे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, काही विभागांचे मुख्यालय नागपुरात सुरू करणे आणि विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याशिवाय कोणत्याही अश्वासनांनी पूर्तता झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

Leave a Reply