गडचिरोली : २८ सप्टेंबर – भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी उडाल्या असून पोलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावत नक्षलवाद्यांचे मोठे शिबिर उध्वस्त केले आहे. यावेळी घटनास्थळावरून आईडी बॉम्ब तथा मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.
भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याच्या गोपनीय माहितीवरून नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान अभियान राबविण्यास गेले असतांना रविवारी दुपारी साधरणत: साडेचार च्या सुमारास भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी अचानक अभियान पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. जवानांनी पाठलाग केला तेव्हा त्यांनी पुन्हा गोळीबार केला व पळून गेले असाच प्रकार तिसऱ्यांदा घडला.
ही चकमक जवळजवळ अर्धा ते पाऊन तास चालली. सी-६० जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहीम राबविली असता घटनास्थळाच्या परिसरात नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर असल्याचे आढळून आले. या शिबिरात आयईडी, मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. आयईडी जागेवरच नष्ट करण्यात आला. नक्षलवाद्यांची ही मोठी योजना असून ती उधळून लावण्यात यश प्राप्त झाले असल्याचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांनी म्हटले आहे.
विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी कौतूक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे. नक्षलवाद्यांची घातपाताची मोठी योजना उधळून लावण्यात अप्पर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे, उप अधिक्षक भाऊसाहेब ढोले, प्राणहिताचे प्रभारी अधिकारी योगिराज जाधव यांनी अभियान यशस्वी केले.