पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा एक धक्का, नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : २८ सप्टेंबर – नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत धक्का दिला आहे. सिद्धू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. आपण पक्षात राहणार आहोत. तडजोडीमुळे माणसाचे अधःपतन होते. पण आपण काँग्रेसचे भवितव्य आणि पंजाबच्या हिताशी कधीही तडजोड करू शकत नाही. यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय. मी पक्षासाठी काम करत राहीन, असं सिद्धू यांनी पत्रात म्हटलं आहे.
नवज्योत सिंग सिद्धूंच्या राजीनाम्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘ही व्यक्ती (नवज्योत सिंग सिद्धू ) स्थिर नाही आणि पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबसाठी धोक्याचे आहे. आपण आधीच सांगितलं होतं, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. अमरिंदर सिंग यांची नाराजी असतानाही काँग्रेस हायकमांडने नवज्योत सिंग सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष केलं होतं.
सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री झाले तर देशाला धोका आहे. सिद्धूंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केल्यास आगामी निवडणुकीत त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवार रिंगणात उतरवू, असं अमरिंदर सिंग म्हणाले. तर चन्नी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून सिद्धू नाराज होते, असं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply