शिकारीच्या नादात पाण्याच्या टाक्यात पडून बिबट्याचा मृत्यू

नागपूर : २७ सप्टेंबर – कुत्र्याचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट पाण्याच्या टाक्यात पडून मृत पावल्याची घटना हिंगणा वनपरिक्षेत्रातील मौजा दाभा येथील विजय काकडे यांच्या शेतात घडली.
सदर शेतात २.५ मीटर खोल पाणीसाठवन टाके आहे. या भागात असणाऱ्या कुत्र्याचा पाठलाग बिबट्याने सुरु केला. याच ठिकाणी असणारे टाके या दोन्ही प्राण्यांना दिसले नसावे. त्यामुळे कुत्रा आणि बिबट दोघेही या टाक्यात पडले. दोघांनाही बाहेर न निघता न आल्याने दोन्ही प्राणी मृतावस्थेत आढळून आले.
सदर घटनेची माहिती मिळता वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगण्याचे आशिष निनावे, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ सदस्य कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे, सौरभ सुखदेवे आदी घटनास्थळी पोहचले. घटनेचा आढावा घेत या दोन्ही प्राण्यांना बाहेर काढण्यात आले. बिबट्याचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले.
यासंदर्भातील नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पाण्यात बूडूनच या प्राण्याचा मृत्यू झाला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. शवविच्छेदन डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. अधिक माहितीसाठी वनविभागाद्वारे पुढील चौकशी सुरु आहे.

Leave a Reply