यंदाचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार लता मंगेशकर यांना

नागपूर : २७ सप्टेंबर – नागपूरच्या छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा जिजामात विद्वत गौरव पुरस्कार यंदा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांनी आज नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेत दिली. रुपये १ लाख ५१ हजार रोख सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
उद्या २८ सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांचा ९३वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार जाहीर करतांना प्रतिष्ठानला गौरवान्वित वाटत असल्याचे सद्गुरुदास महाराजांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे हा पुरस्कार लताजींना मुंबई मुक्कामी खासगी कार्यक्रमातच प्रदान करण्यात येणार असून कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने १९८२ पासून जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असून यंदाचे चाळिसावे वर्ष आहे, आतापर्यंत चाळीस मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यात महामहोपाध्याय डॉ. व. वि. मिराशी, सेतू माधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नि. दांडेकर, अश्या मान्यवरांचा समावेश आहे. लता मंगेशकर यांनी केलेल्या संगीतसेवेचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रपरिषदेला छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजेय देशमुख, सचिव भालचंद्र देशकर, प्रसन्न बारलिंगे, नितीन कुलकर्णी प्रभृती उपस्थित होते.

Leave a Reply