लैंगिक शोषण केल्यानंतर गर्भवती पीडितेला युट्युब पाहून गर्भपात करायला लावणारा आरोपी अटकेत

नागपूर : २६ सप्टेंबर – 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
आरोपी सोहेल वहाब खान आहे आणि पीडित तरुणी जवळपास गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोहेलने २०१६ पासून वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. जेव्हा पीडित तरुणी गर्भवती झाली, तेव्हा आरोपीने तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:चा गर्भपात करण्यास सांगितले. कुटुंब घरात नसताना तिने घरीच नाळ कापून गर्भपात केल्याची माहिती आहे.
सोहेलने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाचे दफन केले. काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र गेल्या आठवड्यात महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटते, की सोहेलने तिला खोटी आश्वासने देऊन फसवले, कारण तो आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे, तर त्याची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल खान हा ड्रायव्हर असून यापूर्वी दोनदा त्याचे लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते आणि त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी खानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. तर फॉरेन्सिक टीमने गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो सफल होऊ शकला नाही.
डीएनए नमुन्यांसाठी आम्ही गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण दुर्दैवाने त्याचा शोध लागला नाही. आम्ही अजूनही गर्भाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply