मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल – संजय राठोड

उस्मानाबाद : २६ सप्टेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकेल. जिथपर्यंत सरकार चालवायचं तो पर्यंत ते चालवतील व नंतर पुढचा निर्णय घेतील. त्यामुळे सरकार टिकवायचं की नाही हे पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, असं शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड म्हणाले. ते उस्मानाबाद येथे बोलत होते. बोलता बोलता त्यांनी महाविकास आघाडीबाबत खूपच मोठं वक्तव्य केलं.
सध्या सरकार स्थिर आहे मात्र ते टिकवायचे की नाही आणि किती काळ टिकवायचं हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हातात आहे. सरकार स्थापन झाल्या पासून 2 महिन्यात पडेल, अशा अफवा भाजप पेरत आहे. मात्र सरकारचा निर्णय फक्त ठाकरे यांच्या हातात आहे, असंही संजय राठोड म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले असून देशभरात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचं कौतुक झालं आहे. लोकांना शिवसेनेच्या सरकारचे काम आवडले आहे. त्यामुळे लोकांना भाजप सरकार हवे आहे, या भाजपच्या दाव्यात तथ्य नाही, असंही राठोड म्हणाले.
राजकारनातं कोणत्याही पक्षात कार्यकर्ता बनायला अनेक वर्षे जातात. मला राजकारणात 30 वर्ष लागली. या काळात लोकांनी 4 वेळेस निवडून दिले. राजकारणात आरोप होतात, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीअंती तथ्य असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मात्र सध्या आरोप करुन लगेच तथ्य न पाहता शिक्षा देणे पद्धत चुकीची असून हा पायंडा बदलला पाहिजे. कार्यकर्ता म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे हे बदला, असे भावनिक आवाहन राठोड यांनी केले.
महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील यांच्यापासून मोठी वैभवशाली राजकीय परंपरा असून अनेकांनी आपल्या कामाचा ठसा कार्यातून उमटविला आहे त्याचे भान ठेवून ती परंपरा प्रत्येकांनी जपली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात संक्रमण परिस्थितीमधून जे राजकारण सुरू आहे त्याचे सर्व पक्ष, सत्ताधारी विरोधक यांनी याचे भान ठेवले पाहिजे व विचार केला पाहिजे असे राठोड म्हणाले.

Leave a Reply