पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांची महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

पुणे : २६ सप्टेंबर – पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या एक वरिष्ठ महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केली आहे. यानंतर भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन केला होता. त्यावर शिर्के यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगितलं होतं. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकाऱ्यास घाणेरडया भाषेत शिवीगाळ केली. . महिला अधिकारी आणि आमदार सुनील कांबळे यांच्यात जवळपास २ मिनिटाचं संभाषण झालं. या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे.
आज भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील कांबळे यांचं तातडीनं निलंबन करावं आणि सुष्मिता शिर्के यांना महापालिकेमध्ये पुन्हा एकदा त्याच पदावर रुजू करावं अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. दरम्यान उद्या पुणे पोलीस आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून सुनील कांबळे यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे.

Leave a Reply