चाकूचा धाक दाखवून लुटली २० लाखांची रोकड

नागपूर : २६ सप्टेंबर – चाकूचा धाक दाखवून चार लुटारूंनी २० लाखांची रोख लुटली. ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गंगा-जमनामागील चिंतेश्वर मंदिर परिसरात घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे लुटारूंचा शोध सुरू केला असून, ओळख पटल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतवारीत कमलेश शाह यांची कुरिअर कंपनी आहे. येथे रोहित पटेल हा व्यवस्थापक असून, राम पुरुषोत्तम पटेल हा येथे काम करतो. शनिवारी सायंकाळी व्यवहाराची सुमारे २० लाख रुपयांची रोख छाप्रूनगर येथे राहणाऱ्या शाह यांच्या घरी पोहोचवायची होती. पटेल यांनी राम व अन्य एका कर्मचाऱ्याला ही रक्कम दिली. रामने ती मोपेडच्या डिक्कीत ठेवली. राम व त्याचा साथीदार मोपेडने छाप्रूनगरकडे जात होते. चिंतेश्वर मंदिर परिसरात मोटारसायकलवर आलेल्या चार युवकांनी रामला अडविले. चाकूचा धाक दाखवून राम व त्याच्या साथीदाराला मोपेडवरून खाली उतरवले. रोख असलेली मोपेड घेऊन लुटारू पसार झाले. रामने व्यवस्थापकाला माहिती दिली. व्यवस्थापकाने लकडगंज पोलिसांना कळविले. पोलिस उपायुक्त लोहित मतानी, लकडगंज पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक अमित जयपूरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा चिंतेश्वर मंदिर परिसरात पोहोचला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करीत लुटारूंचा शोध सुरू केला. व्यवहाराची रक्कम नेमकी किती होती, याबाबत संभ्रम आहे. मालकाला विचारणा केल्यानंतरच ते कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इतवारीतील धान्यबाजार परिसरातील भुतडा चेम्बरमध्ये कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. सायंकाळी राम व त्याचा साथीदार रोख घेऊन मालकाच्या घरी जायला निघाले. लुटारूंनी कार्यालयापासूनच त्यांच्या मागावर होते. चिंतेश्वर मंदिर परिसरात संधी साधून लुटारूंनी रोख पळवली. या लुटपाटीची टीप देण्यात आली असून, ही रक्कम हवालाची असण्याचीही चर्चा परिसरात आहे.

Leave a Reply