गडकरींकडील सर्व विशेषाधिकार काढून घेण्यात यावेत – उच्च न्यायालयात याचिका दाखल

नागपूर : २५ सप्टेंबर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचा दावा करणारा अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल केला आहे. तसेच गडकरींकडील सर्व विशेषाधिकार काढून घेण्यात यावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावेत, अशीही विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
गडकरी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल करून यश मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या शपथपत्रात गडकरींनी आपली संपत्ती, उत्पन्न, वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मतदारांची दिशाभूल झाली असल्याच आरोप पटोलेंनी केला आहे. पण गेल्या सुनावणीत गडकरींनी पलटवार केला होता. पटोलेंनीच या याचिकेसाठी दाखल केलेले शपथपत्र बेकायदेशीर असल्याचा प्रतिदावा केला होता. पटोलेंचे वकील सतीश उके यांनी याला विरोध केला असून पटोलेंचे शपथपत्र नियमांनुसारच असल्याचा दावा केला आहे.
न्यायालयाच्या मनात पूर्वग्रह निर्माण करण्यासाठी आणि न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठी गडकरींना हा अर्ज दाखल केला असून तो न्यायालयाचा अवमान आहे, असाही युक्तिवाद त्यांनी या अर्जाद्वारे केला. याखेरीज गडकरींकडील सर्व विशेषाधिकार काढून घेण्यात यावेत असे आदेश न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावेत, अशीही विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

Leave a Reply