आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे – देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : २५ सप्टेंबर – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठं विधान केलं आहे. आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
नवी मुंबई येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात माथाडी कामगारांना आम्ही सरकारचे दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडावा आणि आम्ही तो सोडवावा अशी व्यवस्था राज्य सरकारमध्ये आम्ही त्या काळात उभी केली होती. अजून पुढचा काळ मिळाला असता तर उरलेले प्रश्नही सोडवले असते. आता या सरकारला संधी आहे. ते सोडवतील याचा मला विश्वास आहे. नाही सोडवले तर आम्हाला पुन्हा संधी मिळणारच आहे. त्यावेळी आम्ही प्रश्न सोडवू, असं सांगतानाच लोकशाहीत कमी अधिक होत असतं. कधी हे असतात कधी ते असतात, असं फडणवीस म्हणाले.
कामगारांचे प्रश्न हे पक्षाच्या पलिकडे पाहायचे असतात. त्यामुळे या चळवळीतील सर्व नेत्यांना जवळ करण्याचं काम आम्ही केलं होतं, असं सांगतानाच माथाडी कामगार चळवळीची मला सखोल माहिती नव्हती. मात्र, नरेंद्र पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर मला या चळवळीचं महत्त्व समजलं. गरिबातल्या गरिबाच्या श्रमाला सन्मान मिळवून देण्याचं काम या चळवळीने केलं आहे, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं.
यादवांना फडणवीसांचं आवाहन
जीएसटीमध्ये माथाडी कामगारांना दिलासा दिला होता. पण नवीन पोर्टलमध्ये एक कॉलम सुटला आहे. मुंबईच्या बाहेर हा कॉलम दिसत नाही. 194 सीचा प्रोब्लेम आहे. तो सुटू शकतो. केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव आपण जर दिल्ली किंवा मुंबईमध्ये कुठे ही बैठक लावली तर आपण नक्कीच मार्ग काढाल याची आम्हाला खात्री आहे आम्ही तिथे उपस्थित राहू, या माथाडी कामगार चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply