५ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेहच सापडला, खून करून फेकल्याची शंका

नागपूर : २२ सप्टेंबर – खापा पोलिस स्टेशन अंतर्गत १५ कि.मी. अंतरावर मौजा टेंभुरडोह शिवार महारकुंड फाट्याजवळ नागपूर येथील प्रदीप जनार्दन बागडे (वय ४७) रा. अजनी याचा मृतदेह मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी ९ वाजताच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत पाईपमध्ये आढळून आला. तो गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार केल्याचे दिसून आले. यावरून पोलिसांनी पवन चौधरी आणि सुमित चौधरी या आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रदीप बागडे हा नरेंद्रनगर परिसरात चायनिजचा ठेला लावत होता. बागडेने १६ सप्टेंबरला शेवटचा कॉल बायकोला केला होता. त्यानंतर मात्र फोन स्विच ऑफ झाला. १७ सप्टेंबरला त्याच्या कुटुंबीयांनी अजनी पोलिस ठाण्यात प्रदीप बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. अजनी पोलिसांनी प्रदीपच्या फोनच्या शेवटच्या लोकेशनवरून खापाजवळील मौजा टेंभुरडोह शिवार महारकुंड फाटा हे घटनास्थळ गाठले. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पाईपमध्ये टाकून ठेवला होता. खेकरा नाल्याच्या पाईपातील प्रदीपचा कुजलेला मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढला होता. मंगळवारी ढाबा चालक हिंगे (३२) याने पोलिसांना माहिती दिली. तसेच मृताच्या खिशात सापडलेल्या ड्रायव्हिंग लायसनवरून प्रदीपची ओळख पटली. याप्रकरणी पो.स्टे. खापा येथे आरोपींविरुद्ध कलम ३0२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply