मुंबई : २१ सप्टेंबर – मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही. त्यामुळे कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेलच. भाजप नेते किरीट सोमय्या हे निव्वळ बदनामी करण्याचं काम करत आहेत. मात्र, कोर्टात आमचं निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.
अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. गेले काही महिने माझ्यावर किरिट सोम्मेया कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. यात माफी मागण्याचीही मागणी केली आहे. त्यासंदर्भातील पुरावे दिले आहेत. त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल. माझी जी बदनामी झाली ती पुसून टाकायला या याचिकेने मदत होईल. मी कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. म्हणून मी कोर्टात दाद मागितली आहे, असं परब म्हणाले.
मी न्यायाधीशाचं काम करत नाही. सोमय्याच न्यायाधीशाचं काम करत आहेत. तेच आरोप करतात आणि निर्णय देतात. मी योग्य प्लॅटफॉर्मवर गेलो आहे. मी कोर्टाकडे दाद मागितली आहे. माझ्यावर झालेला हा अन्याय आहे. त्यासाठी मी कोर्टात आलो आहे. कोर्टात सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच. सोमय्यांनी कोर्टात येऊन उत्तर द्यावं, असं त्यांनी सांगितलं.
सोमय्या यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. ते खोटे आहेत हे लवकर सिद्ध होईल. बेछुट आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी घेतलं आहे आणि ते काम ते करत आहेत. मला पूर्ण खात्री आहे आम्ही सर्व यातून निर्दोष सुटू. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी कट्टा सुरू केला आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळल्या जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येकाला निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी ते करत असतील. आम्ही लोकांसमोर कामे घेवून जाऊ. मुंबईकरांनी प्रत्येकवेळी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. शिवसेनेच्याच हातात मुंबई सुरक्षित राहील ही भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे यावेळीही मुंबईकर महापालिका शिवसेनेकडेच सोपवतील याचा आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले.