संपादकीय संवाद – अनंत गीते बोलले कडव्या शिवसैनिकांच्या व्यथा

शरद पवार हे काही शिवसेनेचे नेते नाहीत, शिवसेनेचे नेते फक्त स्व. बाळासाहेब ठाकरेच आहेत अशा आशयाचे विधान करून शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अपेक्षेप्रमाणे या विषयावर सवाल जबाव यांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.
अनंत गीते यांचे हे विधान अगदीच निरर्थक म्हणता येणार नाही, कोणत्याही कट्टर शिवसैनिकांची नार्को टेस्ट घेतली तर त्याच्या मनात बाळासाहेब ठाकरे हेच नेते असतील असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. हे वास्तवावर आधारित असेच मत आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाने जवळजवळ ५ दशके आधी मराठी मनावर आणि त्यानंतर हिंदू मनांवर एक गारुड केले होते, त्यामुळे लाखो लोक शिवसेनेचे आणि पर्यायाने बाळासाहेबांचे चाहते बनले होते. बाळासाहेबांच्या शब्दावर उभा महाराष्ट्र डोलत होता, याच बाळासाहेबांनी शरद पवारांना कायम विरोध केला होता. बारामतीचा ममद्या, मैद्याचे पोते अश्या शेलक्या विशेषणांनी बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचा समाचार घेत होते, दुर्दैवाने त्याच बाळासाहेबांचे वंशज सत्तेसाठी लाचार होत शरद पवारांचे पाय धरू लागले, हे कोणत्याही कडव्या शिवसैनिकाला मान्य होणे शक्य नाही. अनंत गीते हे शिवसेनेतले पहिल्या फळीतले कडवे शिवसैनिक आहेत, त्यांनी बाळासाहेबांना आपले दैवत मानले आणि बाळासाहेबांनीही त्यांना खूप काही दिले. त्याबद्दल अनंत गीते आजही कृतज्ञ आहेत. ज्याप्रमाणे सत्तेसाठी संजय राऊत शरद पवारांचे लांगुलचालन करतात तसे लांगुलचालन कोणताही कडवा शिवसैनिक करणार नाही त्यामुळेच अनंत गीतेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनंत गीते यांच्या विधानावर मतप्रदर्शन करतांना शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसेनेतील कथित चाणक्य खा. संजय राऊत यांनी शरद पवार हे देशाचे नेते आहेत असे विधान केले आहे. हा या शतकातील सर्वात मोठा विनोद म्हणावा लागेल. ज्या शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्राबाहेर फारशी किंमत नाही आणि महाराष्ट्राबाहेर कुणीही विचारात नाही असे शरद पवार देशाचे नेते कसे होऊ शकतील याचा खुलासा संजय राऊत यांनीच करायला हवा.
शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा दावा अनंत गीते यांनी केल्याचे वृत्त आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी या दाव्याचा प्रतिवादही केला आहे, मात्र पाठीत खंजीर खुपसणे हा पवारांचा आवडीचा छंद असल्याचे कोणताही राजकीय अभ्यासक खासगीत निश्चितच मान्य करेल. सत्तेसाठी पवार काहीही करू शकतात असे बोलले जाते, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी १९७८ साली त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला नंतर मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा काँग्रेसप्रवेशही केला, पंतप्रधानपद मिळवण्यासाठी त्यांनी १९९९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फोडला यावेळी पंतप्रधानपद मिळत नाही किंवा ते मिळवण्याची आपली ताकद नाही हे लक्षात येताच त्यांनी भागते भूत की लंगोटी सही या न्यायाने त्यांनी जे काही पदरात पडते ते मिळविण्यासाठी त्यांनी काँग्रेसशी तडजोडही केली. असा कायम धोकेबाजी करून सत्ता मिळवण्याचा पवारांचा इतिहास आहे हे लक्षात घेता गीते काहीही चुकीचे बोलले नाही हे स्पष्टच दिसते.
पवार धोकेबाजी करण्यात माहीर तर आहेतच पण इतरांनाही धोकेबाजीची संथा ते देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण त्यांनी २०१९ मध्ये दिले आहे, उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि नंतर पवारांनी संथा दिल्यामुळे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपदाची झूल उद्धव ठाकरेंच्या अंगावर चढवण्यासाठी पवारांनीच उद्युक्त केले होते. हे सर्व बघता अनंत गीते यांनी कडव्या शिवसैनिकांच्या मनातील व्यथाच बोलून दाखवली आहे, हे स्पष्ट होते.
गीतेनुसारख्या कडव्या शिवसैनिकांची व्यथा समजून घेत उद्धवपंत भविष्यातील रणनीती आखतील आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला होणाऱ्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आपण सर्वच करूया.

अविनाश पाठक

Leave a Reply