पक्षाशी बेईमानी करणारा कितीही मोठा नेता असला तरी त्याला गाडीतून उतरवून लाथा घाला – सुनील केदार

नागपूर : २१ सप्टेंबर – काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला तरी पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून खाली उतरवून लाथा घाला असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केलं आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणूक आणि जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गद्दारांना धडा शिकवा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
“निवडणुकीत काँग्रेसचा कितीही मोठा नेता बेईमानी करत असला तर त्याला तिथंच गाडीतून उतरवा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसचं मी पाहून घेईन,” असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. आपण सर्वांनी मेहनतीने हा पक्ष उभा केला असल्याचंही यावेळी ते म्हणत आहेत. कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे त्यामुळे वाटेल तसं करणार हे चालणार नाही असंही यावेळी ते म्हणाले. तसंच मला फोन करा असंही म्हटलं आहे.
“सुनील केदार यांची यामागे काही दुर्भावना आहे असं वाटत नाही. पक्षाशी कोणीही गद्दारी करत असेल तर त्याबद्दलचा राग त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांना तसंच करायचं आहे असं समजण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सचिन सावंत यांनी यावेळी यामागे गटबाजी असल्याचा आरोपही फेटाळून लावला.
नागपूर जिल्हाबँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार अशिष देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप अशिष देशमुख यांनी केला होता.
अशिष देशमुख म्हणाले होते की, मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हाबँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला. जनसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. आज १९,२० वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली. ॲड. आसिफ कुरेशी हे महाराष्ट काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली होती.
“हे १५० जरी नागपूर जिल्हा बँकेचे असले तरी वर्धा, उस्मानाबाद सहकारी बँकेचे मिळून २१० कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोर्टात खटला सुरु आहे. त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवण हे काही सरकारला शोभत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सुनील केदार यांना बडतर्फ कारावं”, अशी मागणी देखाल अशिष देशमुख यांनी केली होती.

Leave a Reply