काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे पोलिटिकल सुसाईड, प्रत्येक शिवसैनिकांचे हेच मत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : २१ सप्टेंबर – शिवसेना नेते अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गीते यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा. त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, ही युती नकोच, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. आज एक संजय राऊतांचा अपवाद जर सोडला तर राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करत असतात. पण मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
अनंत गीते हे हृदयपासून बोलत होते. जे बोलत होते ते ऐतिहासिक सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी दुर्देवी, अनैसर्गिक आघाडी झाली हे बघून बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जित केली असती. अशा शिवसेनेसाठी मी आयुष्याचा कण आणि कण वेचला नाही असं त्यांनी सांगितलं असतं. माझी शिवसेना देव, देश आणि धर्मासाठी काम करत आली आहे, असंही ते म्हणाले असते, असं सांगतानाच परभणीचे खासदार बंडू जाधव यांचंही काही दिवसांपूर्वी त्यांचं भाष्य ऐकलं. ही आघाडी अकबर-बिरबलाच्या कहाणी सारखी आहे. वेळ आली तर आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली तुडवू असं ते म्हणाले होते, याची आठवणही मुनगंटीवार यांनी करून दिली.

Leave a Reply