एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने गोंदियात खळबळ

गोंदिया : २१ सप्टेंबर – एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी या गावात ही घटना घडली आहे. कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिसेन कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मृतकामध्ये रेवचंद डोगरु बिसेन (५१), मालता रेवचंद्र बिसेन (४५), पूर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बीसेन (१७) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरू आहे. हत्या की आत्महत्या या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
बिसेन कुटुंबातील तिघांचे मृतदेह घरात बिछान्यावर आढळून आले तर, एकाचा मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळं तिघांची हत्या करुन नंतर आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच, सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेनं गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply