अनंत गीते यांचे विधान सत्य परिस्थितीवर आधारित – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २१ सप्टेंबर – शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना नेते अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गीते यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिली. त्यानंतर आता फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गीतेंनी केलेलं वक्तव्य ही सत्य परिस्थिती आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “मी पहिल्यापासून सांगतोय कि महाराष्ट्रात तीन पक्षांची झालेली आघाडी ही अनैसर्गिक आहे. अशा प्रकारची ही आघाडी कधी चालू शकत नाही, असं सांगत फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारला फटकारले.
महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेसह मिनी विधानसभेच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत, महाविकास आघाडीला नक्कीच त्यांची जागा दिसेल, पण ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका झाल्या पाहिजेत, असं सांगत देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं.

Leave a Reply