अनंत गीते यांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य योग्यच – नाना पटोले

मुंबई : २१ सप्टेंबर – शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते किंवा गुरु होऊ शकत नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनंत गीते यांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य योग्यच असल्याचं म्हटलं आहे.
नाना पटोले म्हणाले, “शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या खंजीर खुपसला आणि शरद पवारांच्या वक्तव्यावर आमतं कोणतंही स्टेटमेंट असणार नाही. केवळ आम्ही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र होतो हे त्यांचं वक्तव्य बरोबर आहे. शिवसेना- काँग्रेस युती होऊ शकत नाही असं म्हटलं जात होतं. महाविकास आघाडी ही त्यावेळची राजकीय परिस्थितीनुसार तयार झाली. त्यामुळे अनंत गीतेंच्या या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो. हे बरोबरच आहे. अनंत गीते काय चुकीचं बोलले नाहीत”
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची सूचना केली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्र लिहून उत्तर दिलं. त्याबाबत नाना पटोले म्हणाले, “मुद्दा महिलांच्या सुरक्षेचा आहे, मग तो देशाचा असो अथवा राज्याचा. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या संसदेचं अधिवेशन आधी बोलवण्याबाबतच्या विधानाचे समर्थन करतो. अधिवेशन होईल तो नंतरचा भाग आहे – त्यामुळे कायदा व्हावा हे महत्त्वाचं आहे. अधिवेशन घेणं हे महत्वाचे नाही” असं नाना पटोले यांनी नमूद केलं.
राज्यपालांचा एक अधिकाराचा भाग आहे. राज्यपाल यांनी शासनाच्या कामात रोज हस्तक्षेप करावा ही एक नवीन परंपरा आपल्याला पाहायला मिळते आहे. शासन म्हणून पूर्ण जबाबदारी आपण घेतो आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला.

Leave a Reply