संपादकीय संवाद – नाना पटोलेंचा मित्रपक्षांना टोला

किरीट सोमय्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यापासून रोखल्यावर त्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत आता आपण काँग्रेसच्या मंत्र्यांच्याही घोटाळ्याच्या फायली बाहेर काढील असा इशारा दिला आहे. त्याच्या प्रतिउत्तरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर नाही त्याला डर कशाची असे सोमय्यांना सुनावले आहे.
नानांचा प्रतिवाद हा रास्तच म्हणावा लागेल, जर काँग्रेसच्या मंत्र्यांनी कोणतेही घोटाळे केले नसतील, तर ते का घाबरतील विरोधक आरोप भलेही करतील पण ते सिद्ध होणार नाहीत, शेवटी विरोधक आरडाओरड करून चूप बसतील, हे नानाचे म्हणणे अगदी योग्य आहे. मात्र हे म्हणत असताना नानांनी मित्रपक्षांवर सहज इशारा केला आहे. नानांचा नैसर्गिक मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप झाले, तसे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते खवळून उठले हाच प्रकार शिवसेनेबाबतही झाला. हसन मुश्रिफांविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार म्हटल्याबरोबर त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवरच निदर्शने करून सोमय्यांना अडवण्याचा इरादा जाहीर केला होता.
जर मुश्रिफांची पाटी कोरी असेल तर त्यांनी का घाबरावे? त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली आहेच, जर सोमय्यांचे आरोप खोटे सिद्ध झाले तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल, मात्र आधीच त्यांना अडवण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न निर्माण होतो.
राजकारण म्हटले की, थोडेफार कमीजास्त चालतेच हमाम मे सब नंगे होते हैं या न्यायाने राजकारणात कुणीही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नसतो मात्र एखादा निर्णय घेताना व्यापक जनहित लक्षात ठेऊन निर्णय घेतला तर तो चुकलाही असला तरी जनता दुर्लक्ष करते, मात्र जनहित डावलून व्यक्तिगत स्वार्थासाठी निर्णय झाला तर जनता खाली आपटालाही मागे-पुढे पाहत नाही.
त्यामुळेच कर नाही त्याला डर कशाची असे सांगत नाना पटोलेंनी मित्रपक्षांना चांगलाच टोला दिला आहे. अर्थात मित्रपक्षांनी तो समजून घ्यायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply