“तो क्षण, तो आणि ती…” – माधव पाटील

हल्ली राज्यात सर्वत्र गेल्या तीन-चार दिवसांपासून तुफानी पावसाने थैमान घातले आहे. दे दणादण अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, पूर इ. मुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. दळणवळणाचे मार्ग ठप्प झाले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. या अस्मानी संकटाच्या सततच्या बातम्यांनी मन सुन्न झाले आहे. न्यूज चॅनेल ऐकता पहाता कंटाळलेलं मन विचलित झालं अन अचानक विरंगुळा की करमणूक म्हणून पावसाळी मन सोनी मराठीवरल्या ‘अजुनी बरसात आहे’ वर जावून खिळलं. तशी मला एखाद्या चॅनेल वरील हिंदी वा मराठी मालिका बुड टिकवून पहायची मुळीच सवय नाही (रामायण – महाभारत सोडल्या तर). पहाता पहाता या मराठी मालिकेतील एका डायलॉगनं मात्र मन खुपच भावलं. त्यातलाच तो क्षण, तो आणि ती अर्थात तो प्रसंग ऐकून पाहून…
मराठी मालिका | चित्रपटातली उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडगोळी. ‘अजुनि बरसात आहे’ मधला आदिराज आणि मीरा. दोघेहि व्यवसायाने डॉक्टर, तो सर्जन तर ती ऑपथॅल्मॉलॉजिस्ट (डोळ्याची) आज अचानक मालिकेतील प्रसंग पाहिला तो असा – डॉ. आदिराज ऐन बाजारओळीच्या गर्दीत रस्त्यालगत एक टेबल मांडून दवाखाना थाटतो. तेवढ्यात डॉ. मीरा खरेदीनिमित्त त्या ओळीत दाखल होते. अचानक तिची दृष्टी डॉ. आदिराजकडे वळते. आदित्य एका वृद्ध रुग्णाला नीट तपासतो अन् औषधी देतो. तेवढ्यात एक महिला आदिराजकडे येते. तो नीट विचारपुस करून औषधी देतो, एवढेच नव्हे तर पाकिटातून पैसे काढून तिच्या हातावर ठेवतो. हे सर्व डॉ. मीरा दुरूनच आश्चर्याने न्याहाळत असते. त्याची ही अनोखी प्रॅक्टिस नव्हे सेवा पाहून ती सुखावते आणि त्याचे जवळ येवून म्हणते – हे तू केव्हा पासून…(पुढचं डॉ. आदिराजचं संभाषण ऐकण्यासारखं आहे ते असं…)
हो ना मी हे अनेक वर्षांपासून करतोय. जे माझ्यापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा माझा प्रयत्न आहे. सांगण्याचे तात्पर्य किती हा सुंदर माणुसकीचा अन् माणसानं माणसासाठी सेवारत रहाण्याचा विचार म्हणूनच या पावसाळी मालिकेतील पावसाळी वातावरणातील तो क्षण, (डायलॉग) तो आणि ती(ची) भेट मला खूपच भावली हे सांगणे न लगे…

माधव पाटील

Leave a Reply