आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत – देवेंद्र फडणवीस

गोवा : २० सप्टेंबर – आज राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी कराड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतल्यापासून बऱ्याच घडामोडी घडल्या. किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करत दुसरा घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मुश्रीफांनी केलेल्या आरोपानंतर चंदक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलं. मात्र मुश्रीफांनी आपल्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती, असं मुश्रीफ म्हणाले. मात्र यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.
हसन मुश्रीफांनी दावा केला की, भाजपमध्ये येण्याची मला ऑफर देण्यात आली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, कोणी दिली मुश्रीफांना ऑफर? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल, जो एखादा व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसात निघाला असताना पोलीस त्याला अडवितात, त्याला घरात कोंडून ठेवतात. हे तर ठोकशाहीचच सरकार आहे. सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईवर फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे.
स्वतंत्र भारतात अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था पाहायला मिळाली नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. हे खूपच भयानक असून आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असंही ते म्हणालेत.
पुढे फडणवीस म्हणाले की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितलं जातं की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे. पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल, असं सांगायला ही फडणवीस विसरले नाही.
असं असू शकतं की, मुख्यमंत्र्यांना कारवाईबाबत काही माहित नसेल. ही कारवाई थेट गृहमंत्र्यांनी केली असेल. पण माझं मत असं आहे की, मुख्यमंत्र्यांना कळाल्यानंतर त्यांनी दखल घेऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply