संपादकीय संवाद – जुने वैभव परत आणण्यासाठी काँग्रेसने सर्वप्रथम शरद पवारांसारख्या सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त करणे गरजेचे

काँग्रेस पक्षाची आजची अवस्था जमीन गेलेल्या जमीदारासारखी झालेली आहे. सध्या शिल्लक असलेल्या हवेलीसमोर बसून हे जमीनदार हवेलीही कशी सांभाळायची याची चिंता करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली असल्याचे वृत्त आहे. साहजिकच या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा चालू मित्रपक्ष काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पवारांनी केलेली टीका ही अवास्तव आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एकेकाळी संपूर्ण देशावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसची सत्ता आता तीन किंवा चार राज्यांमध्ये शिल्लक राहिली आहे. काही राज्यांमध्ये तर काँग्रेसचे अस्तित्वही नाही, संसदेतही जेमतेम ५० च्या आसपास खासदार निवडून आल्यामुळे काँग्रेसला रीतसर विरोधी नेतेपक्षपदावरही अधिकार सांगता आला नाही, इतकी या पक्षाची दुर्गती झाली आहे.
काँग्रेसच्या या दुर्गतीला विविध कारणे आहे, त्यातील काही कारणे म्हणजे काँग्रेसची जनतेशी असलेली नाळ पूर्णपणे तुटलेली आहे, दुसरे कारण म्हणजे या पक्षाने घराणेशाहीच्या चौकटीबाहेर पडण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, परिणामी देशातील एकच कुटुंब या पक्षाचे सत्ताकेंद्र बनले आहे. परिणामी गेल्या ५० वर्षात अनेक खांदे काँग्रेसी पक्षाला सोडून गेलेले आहेत. यामुळे पक्ष दिवसेंदिवस खिळखिळा होत गेलेला आहे.
ज्याप्रमाणे घराणेशाहीमुळे मोठे नेते पक्ष सोडून गेले आणि नवा पक्ष काढला त्याचप्रमाणे अनेक नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थासाठीही काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षांशी घरठाव केलेला दिसतो आहे. शरद पवारही त्यातलेच एक आहेत. १९७८ मध्ये शरद पवारांनी जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस सोडली तेव्हा पवार बरेच तरुण होते, त्यांची धडक कार्यशैली बघता पुढील काही वर्षात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चित झाले असते, मात्र त्यांना मुख्यमंत्री होण्याची प्रचंड घाई झाली होती, त्यांनी वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्री बनण्याची घाई केली आणि त्यासाठी पक्षनेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसत मुख्यमंत्रीपद मिळवले. सुमारे ९ वर्षानंतर याच मुख्यमंत्रीपदासाठी पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले, आणि त्यानंतर १२ वर्षांनी पंतप्रधान व्हायचे म्हणून त्यांनी पक्ष सोडला. ज्या काँग्रेसने पवारांना लहान वयात आमदार बनवले मंत्री बनवले त्या काँग्रेसशी पवारांनी एकदा नव्हे तर दोनदा गद्दारी केली आहे, विशेष म्हणजे काँग्रेसच्या आधाराने मोठे होऊन दुसऱ्या संधीसाठी पक्षत्याग करणारे सूर्याजी पिसाळ प्रवृत्तीचे शरद पवार काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येत आहेत. अश्या सूर्याजी पिसाळांनीच काँग्रेसला आजच्या परिस्थितीत आणून ठेवले आहे, आणि आज त्याच काँग्रेसवर तोंडभरून टीका करायलाही पवार तयार झाले आहेत.
काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील तर काँग्रेसने सर्वप्रथम घराणेशाहीच्या जोखडातून बाहेर पडणेच श्रेयस्कर ठरणार आहे. त्याचबरोबर असे सूर्याजी पिसाळ शोधून त्यांचे खरे चेहरे जनतेसमोर आणावे लागणार आहे, त्यापाठोपाठ जनतेशी तुटलेली नाळ कशी जोडता येईल याचाही विचार करायला हवा.
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत तुम्हाला सक्षम संसदीय लोकशाही व्यवस्था हवी असेल तर देशातील सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही तितकेच सक्षम असले पाहिजे, एका काळात काँग्रेस ही बळकट होती आणि भाजप कुठेच नव्हती हळूहळू भाजपने आपली शक्ती वाढवली आज भाजप देशातील प्रमुख सत्ताकेंद्र बनले आहे तर काँग्रेस कुठेच नाही, ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसला कडक पाऊले उचलत सर्वप्रथम सूर्याची पिसाळचा बंदोबस्त करावा लागेल हीच खरी आजची गरज आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply