राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज – राजेंद्र शिंगणे

नागपूर : १३ सप्टेंबर – अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सजिन व रेमडीसिव्हीर वर लक्ष केंद्रित केले होते. तिसरी लाट जर आली तर, रेमडेसिव्हीर तीन चार पट उपलब्ध आहे, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
आम्ही औषध कंपन्यांच्या संपर्कात आहोत. प्रोडक्शन वाढवले पाहिजे, कच्च्या मालाची अडचण येत असेल तर कंपन्यांनी माहिती द्यावी, शासन मदत करणार असल्याचं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. राज्याची ऑक्सजिनची उपलब्ध क्षमता साडे बाराशे ते तेराशे टन होती. केंद्र सरकारने पाचशे टन पर्यंत मदत केली होती. आपण १८०० मेट्रिक टन पर्यंत पोहचलो असून, आता तीनपट ऑक्सिजन तयारी केंद्राच्या सुचने प्रमाणे केली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
उद्योग विभागच्या माध्यमातून ऑक्सिजनचे नवे प्लांट तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार तयारीला लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला जे रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होते, ज्यांना ऑक्सिजन लागले होते आणि ज्यांना इतर आजार होते अशांना म्युकर मायकोसिस सारख्या आजारांचा त्रास झाला. तेव्हा एम्फोटेरेसिन इंजेक्शनची ही कमतरता होती आता त्याबद्दल ही तयारी करत आहोत. डॉक्टर्सनी त्या संदर्भात वेगवेगळे निष्कर्ष पुढे केले आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय राजेंद्र शिंगणे यांनी आज नागपूर आणि अमरावती विभागाचा आढावा घेतला. सणासुदीच्या काळात भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच कोरोना काळात ऑक्सिजन कमी पडणार नाही याबाबतचे नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

Leave a Reply