प्रशिक्षण कार्यक्रमातून परतलेले नागपूरचे १२ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर : १३ सप्टेंबर – पुणे येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातून परत आलेले १२ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात नागपुरातील ३३ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे पोलिस विभाग अलर्ट झाला आहे. विशेष म्हणजे लसीकरणानंतरही या पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंता वाढली आहे. यापूर्वी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनाही कोविडची बाधा झाली होती.
पुण्यात ३0 ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला राज्यातील अनेक जिल्ह्यांतून पोलिस सहभागी झाले होते. ९ सप्टेंबरला प्रशिक्षण संपल्यानंतर पोलिस कर्मचारी स्वत:च्या गावी परतले. परत आल्यापैकी एका पोलिस कर्मचार्याला ताप आला. कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यासोबत प्रशिक्षणासाठी गेलेल्यापैकी २0 पोलिस कर्मचार्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १0 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर उर्वरित १२ जणांची कोरोना चाचणी केली असता आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. सर्वांचे आमदार निवासात विलगीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या मदतीने उपचार सुरू आहे. शिबिराला गेलेले अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिस प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलिसांचे लसीकरण खूप आधीच पूर्ण झाले होते. यापैकी एका कर्मचार्याला फक्त एका औषधी कंटेंटची एलर्जी असल्यामुळे त्याने लसीचे डोस घेतले नव्हते. उर्वरित सर्वांचे लसीचे डोस पूर्ण झाल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, प्रशिक्षणाला नागपूरसह अनेक जिल्ह्यातील पोलिस सहभागी झाल्यामुळे सर्व जिल्ह्यातील पोलिस विभाग अलर्ट झाला आहे. नागपूर पोलिस दलाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कोरोना पॉझिटिव्ह पोलिस कर्मचार्यांना विलगीकरणात ठेवले आहे. उर्वरित पोलिस कर्मचार्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. सर्व कर्मचार्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग करण्यात येणार आहे.

Leave a Reply