गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा संपन्न

गांधीनगर : १३ सप्टेंबर – भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. भूपेंद्र पटेल हे राज्याचे १७ वे मुख्यमंत्री झाले आहे. पक्षाने नियोजनानुसार आज फक्त भूपेंद्र पटेल यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. अमित शहांनी पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावर भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन केलं. तर पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
आता भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता आहे. भाजपकडून मंत्रीपदासाठी नेत्यांची नाव निश्चित झाल्यानंतर येत्या काही दिवसांत पटेल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाही शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहा यांनी त्यांचं मंचावर अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. यासोबत भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही भूपेंद्र पटेल यांचं अभिनंदन केलं.

Leave a Reply