अखिलेश यादव आणि मायावती या दोघांच्या चुकीमुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले – असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : ९ सप्टेंबर – समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, असं वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं. ओवैसी यांनी उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमध्ये हे वक्तव्य केलं. यावेळी एमआयएम पक्षाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात मतं फोडल्याचे विराधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यांनी अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केल्यानंतर सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेला संबोधित केले.
ओवेसी म्हणाले, “असं म्हणतात की, जर ओवैसी लढतील तर ते मत खातील.” सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना भरभरून मतं दिली तर तिथून भाजपाचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले. तसेच २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली. तेव्हा तर मी निवडणूक लढवत नव्हतो, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का, असंही ते म्हणाले. तसेच दोन्ही वेळा भाजपा मुस्लिमांच्या मतांनी जिंकली नाही, असा दावाही ओवैसी यांनी केला.
ओवैसी म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत एमआयएमने हैदराबाद, औरंगाबाद आणि किशनगंजमधून तीन जागा जिंकल्या. आम्ही हैदराबादमध्ये भाजपचा पराभव केला. मोदी आणि अमित शहा आम्हाला हरवायला आले होते, पण तरीही ते हरले. औरंगाबादमध्ये एमआयएमने शिवसेनेच्या खासदाराचा २१ वर्षांनी पराभव केला. किशनगंजमध्ये आम्ही हरलो पण आम्हाला लाखो मते मिळाली.” ते म्हणाले की, “मी जिथे लढतो तिथे भाजप जिंकत नाही. विधानसभा आणि संसदेत आवाज उठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असावा अशी आमची इच्छा आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व आपल्या लोकांना निवडून पाठवू. सपा, बसपा आणि काँग्रेसने आतापर्यंत तुमचं खूप शोषण केलंय. आता हे थांबवायला हवं.”
यावेळी ओवैसी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “केंद्राने उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ११६ कोटी रुपये दिले होते, परंतु त्यांनी त्यापैकी फक्त १० कोटी रुपये खर्च केले आहेत.” “मी संसदेत हा मुद्दा मांडला असताना अखिलेश यांनी या विषयावर बोलण टाळलं. ओवैसी यांचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवणार आहे.

Leave a Reply