सदाभाऊ खोत यांच्या मुलाने टीका करणाऱ्यावर केला सशस्त्र हल्ला

सांगली : ८ सप्टेंबर – पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या कारणातून खोत यांचा मुलगा सागर यानं आपल्या साथीदाराच्या मदतीनं टीका करणाऱ्यावर सशस्त्र हल्ला केला आहे. संशयित आरोपी सागर यानं आपल्या साथीदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांच्या घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत शिवीगाळ करत मारहाण केली आहे. संबंधित घटना सोमवारी रात्री वाळवा तालुक्यातील तांबवे याठिकाणी घडली आहे.
याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात सागर सदाभाऊ खोत, स्वप्निल सुर्यवंशी, अभिजीत भांबुरे आणि सत्यजित कदम अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री रविकिरण माने आपल्या कुटुंबासोबत जेवण करत होते. दरम्यान संशयित आरोपी सागर खोत आपल्या साथीदारांसह चाकू, तलवार, गुप्ती अशी प्राणघातक शस्त्र घेऊन माने यांच्या घरात शिरला. याठिकाणी आमदार पूत्र सागरनं ‘तू सदाभाऊंवर टीका करतोस का? तुला खूप मस्ती आली आहे का?’ असं म्हणत मारहाण आणि शिवीगाळ केली आहे.
पण कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर सागर खोत आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात सागर खोतसहीत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पण संबंधित हल्ला आपण केलाच नसल्याचं स्पष्टीकरण सागर खोत यांनी केलं आहे. संबंधित घटनेशी आपला काहीही संबंध नाही. आपण घटनास्थळी नव्हतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असंही सागर खोत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सध्या पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. संबंधित मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. याच रागातून सागरनं आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे.

Leave a Reply