शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भारतीय किसान संघाचा उद्या देशव्यापी आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली : ७ सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीसंबंधित भारतीय किसान संघाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उद्या ८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रीनारायण चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. शेतकऱ्यांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. यासाठी ऑगस्टमध्ये सर्व विभागांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून उद्या ८ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात ५०० जिल्ह्यांमध्ये सांकेतीक धरणे आंदोलन केले जाईल. यावेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा आणि त्यांच्या पिकांसाठी चांगला मोबदला द्यावा. व्यापारी आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतात. तसंच सरकार एमएसपी ची घोषणा करतं. पण त्याचे पैसे मात्र ६ महिन्यांनी मिळतात. सरकार एकूण शेती उत्पन्नापैकी २५ टक्केच खरेदी करतं. सरकार बहुतेक खरेदी ही फक्त दोन राज्यांमधून करतं. इतर राज्यांच्या शेतकऱ्यांची फक्त नोंदणी होते, असं बद्रीनारायण चौधरी म्हणाले.
एमएसपी च्या खरेदीसाठी कायदा करावा. शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा यासाठी सरकारने व्यवस्था करावी. जी MSP आता दिली जात आहे, ती एक धोका आणि फसवणूक आहे. आम्ही उद्या जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत. सकाळी ११ वाजता आंदोलन करू. आम्ही तिन्ही कृषी कायदे स्वीकार केले होते. पण त्यात ५ सुधारणा कराव्यात, अशी मागणी चौधरी यांनी केली. संयुक्त किसान मोर्चाने बोलावलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही, असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply