मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल – नाना पटोले

नागपूर : ७ सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
कोरोनाबाबत केंद्र सरकार निर्णय घेतं. त्याचं पालन राज्य सरकार करतं. भाजप राज्य सरकारला बदनाम करत आहे. भाजपला आंदोलनच करायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात करावं. कारण मोदी सरकारनेच कोरोनाच्या गाईडलाईन आणि सूचना दिल्या आहेत, असा हल्ला त्यांनी भाजपवर चढवला.
ज्यांची सत्ता तेच विजयी होतात
काँग्रेसच्या पुरवणी यादीबाबत हायकमांड निर्णय घेणार असून काँग्रेसमध्ये नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी बेळगाव महापालिका निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. साधारणपणे ज्या राज्यात ज्यांचं सरकार असतं तिथे त्यांचा विजय होतो, असं ते म्हणाले.

Leave a Reply