भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली – शरद पवार

पुणे : ७ सप्टेंबर – हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. आपण सर्व हिंदूच आहोत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भागवत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मोहन भागवतांच्या विधानाची खास शैलीत खिल्ली उडवली. चांगली गोष्ट आहे. भागवत सर्व धर्म एकच समजतात. दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला ही नवीन गोष्ट त्यांनी सांगितली. माझ्याही ज्ञानात भर पडली ते वाचून, असा चिमटा पवारांनी काढला.
याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भागवतांवर टीका केली होती. मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं, असा टोलाही पटोले यांनी लगावला होता.

Leave a Reply