नागपुरातील डागा रुग्णालयात डॉक्टरांनी जमिनीवरच केली प्रसूती

नागपूर : ७ सप्टेंबर – वाडी येथील एका महिलेला प्रसूतीसाठी डागा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे आणत नाही तोच तिला प्रसवकळा आल्या. डॉक्टरांनी वेळ न दवडता जमिनीवरच प्रसूती केली. या महिलने मृत बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्याची तक्रार दिली. तर प्रसूती केली जात असताना महिलेच्या नातेवाईकांनी त्याचा व्हिडीओ तयार करत अडथळा निर्माण केल्याची तक्रार रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.
राणी नावाची ही महिला वाडी येथील रहिवासी आहे. ती काही दिवसांपूर्वी कन्हान येथे माहेरी आली होती. तिच्यावर एका खासगी हॉस्पिटलसोबतच डागा रुग्णालयातून उपचार सुरू होते. रविवारी राणीला दुखणे सुरू झाले. स्थानिक डॉक्टरने तातडीने डागा रुग्णालयात जाण्यास सांगितले. रात्री सुमारे १0 वाजता डागा रुग्णालयात पोहचल्यावर तिथे डॉक्टर नव्हते. भरती करण्याची विनंती केल्यावरही कोणीच लक्ष दिले नाही. राणी वेदनेने तडफडत होती. शेवटी प्रतीक्षालयातच मूल बाहेर आले. नंतर परिचारिकांनी राणीला वॉर्डात भरती केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तर डागा रुग्णालयाच्यावतीने मात्र याचे खंडण करण्यात आले. ही महिला रात्री रुग्णालयात येताच ती स्वच्छतागृहात दोनदा गेली. दुसर्यांदा आली तेव्हा तिला प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. वॉर्डातच ती खाली बसली. डॉक्टर, परिचारिकांनी प्रसंगावधान राखून जमिनीवरच प्रसूती केली. बाळ मृत जन्माला आले होते. तिचे बाळ कमी दिवसांचे होते. तिने रुग्णालयात येण्यास बराच उशीर केला होता. रुग्णालयाकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नसल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply