लाडक्या बैलाला धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

बुलडाणा : ६ सप्टेंबर – शेतकऱ्यांचा मित्र आणि त्याचा साथीदार मानला जाणाऱ्या बैलाच्या सन्मानाचा दिवस म्हणजे बैलपोळा . संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा साजरा केला जात आहे. पण, बुलडाण्यात आपल्या लाडक्या बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बोरी आडगाव इथंही घटना घडली. आशुतोष सुरवाडे असं मृत शेतकऱ्यांचं नाव आहे. पोळा सण आला. त्यामुळे आशुतोष सुरवाडे हे आपल्याकडे असलेल्या बैलाला आंघोळ घालण्यासाठी तलावावर घेऊन आले होते.
आशुतोष हा तलावाच्या अलीकडेच बैलाला आंघोळ घालत होता. पण, थोड पुढे गेल्यामुळे पाण्याचा अंदाज चुकला. त्यामुळे आशुतोष याचा तोल गेला अन् तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, पण आसपास कुणी नसल्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाला पण आशुतोष काही घरी आला नाही, त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोधाशोध सुरू केला. बैलाला धुण्यासाठी तलावावर गेल्याचं कळलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. तेव्हा बैल तसेच उभे होते पण आशुतोषचा कुठेही पत्ता नव्हता. गावकऱ्यांनी जेव्हा शोधाशोध केली असता तो पाण्यात बुडाल्याचं लक्षात आलं.
गावकऱ्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गावकऱ्यांनी आशुतोषचा मृतदेह बाहेर काढला होता.

Leave a Reply