सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

पोटावर हात फिरवा एकदातरी आठवड्याभरात

“आहारो महाभैषज्यम उच्यते” अर्थात योग्य संतुलित आहार योग्य प्रमाणात, आयुर्वेदाने विषद केलेल्या नियमांप्रमाणे नियमित घेतल्यास, औषधांची गरज पडणार नाही. आणि असा मनुष्यप्राणी ३६००० रात्री म्हणजेच शंभर वर्षे विना रोग जगु शकतो. असे भाष्य आयुर्वेदाचे महान आचार्य यांनी केले आहे.
मुळात आमची आहार पद्धती अतिशय सुनियोजित आहे. शरीर शास्त्राप्रमाणे आहे. वात, कफ,पित्त, आमच्या शरीर प्रकृतीच्या विपरीत आहार घेणे केव्हाही योग्य. त्यामुळे वात प्रकृती असणा-यांनी वायुवर्धक पदार्थ न खाता वातशामक पदार्थ खावेत. तीच् गोष्ट कफ आणि पित्त प्रकृतीच्या लोकांना लागू होते.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आहाराचे विश्लेषण चार प्रकाराचे भक्ष्य – चावून खाण्यायोग्य ; चोप्य – चोखण्यायोग्य ; लेह्य – चाटून खाण्यायोग्य ; पेय – पिण्याजोगे पदार्थ.
अर्थात जेवणाचे सुद्धा दहा नियम –
१) अन्न गरम असताना जेवावे – प्रदीप्त जठराग्नी साठी उत्तम आणि भोजन पचण्यासाठी सर्वोत्तम
२) स्निग्ध आहार – शरीर बलशाली, सुदृढ करण्यासाठी अतिशय उत्तम
३) मात्रापुर्वक आहार असावा – जशी भुक त्याप्रमाणात जेवावे. पहिली ढेकर जेवण संपण्याची नांदी असावी.
४) पहिले पचल्यानंतर च् पुढले जेवण असावे. भुक लागली नसताना शक्यतोवर जेवण टाळावे. शक्य नसल्यास अतिशय कमी/तंतोतंत आहार घ्यावा.
५) प्रकृतीच्या विपरीत आहार असावा. जसे वर सांगितले. वात असेल तर वातशामक आहार असावा. कफ असेल तर आहार कफ शामक असावा आणि पित्त असेल तर आहार पित्त शामक असावा.
६) आहार अनुकूल ठिकाणी शांत चित्ताने ग्रहण करावा.
७) लवकर लवकर जेवू नये. तर सावकाश जेवावे.
८) खुप हळूहळू सुद्धा जेवू नये.
९) एकाग्र चित्त होवून आहार घेतला पाहिजे.
१०) आत्म शक्ति प्रमाणे आहार घेतला पाहिजे – म्हणजे आपल्या प्रकृतीला अनुकूल असाच आहार घ्यावा.

आयुर्वेदचे आहार शास्त्र जर व्यवस्थित पणे पाळले तर शरीराला रोगाचे भय कधी ही राहणार नाही. आहार आणि व्यायाम हे दोन शंभर वर्षे निरोगी आयुष्याचे हुकमी एक्के.
ऋषिमुनींनी आम्हाला आयुर्वेदातून आहारशास्त्रातून निरोगी आहाराची दिशा दिली आणि भगवंताने आम्हाला जीभ दिली आणि मनुष्याने मग जीभेचे चोचले लावले. आणि ह्या चोचल्यांच्या लावालावीत आहारशास्त्राची दिशा भरकटली आणि मनुष्यप्राणी पिझ्झा, पास्ता, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा अशा चवींच्या रस्साखेचीत जीभेच्या चोचल्यांच्या आहारी गेला आणि आजच्या पिढीने आहारशास्त्राचे बारा वाजवले.
आमची SIEMENS कतार ची मेस सगळा ताफा तरूण पाहिजे तसा तिखट खाणारा. किंबहुना तिखट, तर्रीदार जेवणाचा चोचलेदार वर्ग. पण त्यावेळी चार पाच जर्मन म्हातारे आमच्या मेसमध्ये जेवत असत आणि त्यांच्याकारणाने आम्हाला खूप अळणी जेवण मिळत असे. सकाळचा नाश्ता तर कामावर जाण्याच्या घाईत कसाही चालत असे मात्र दुपारचे आणि रात्रीचे जेवण रोज रोज अळणी जेवुन कंटाळा येत असे. जेवताना पोटातून आवाज येत असे – “अरे भाई कुछ तिखा हो जाए।”
आता मात्र मी कंटाळलो, त्या काळी ई-मेल ची सुविधा होती. व्हॉट्स ॲप सारखी सुविधा नव्हती. घरी ई-मेल करून बायकोकडून संपूर्ण सामानाची यादी मागवली आणि अगदी मिक्सर पासून ते मोहरीपर्यंत सगळा जामानिमा जमवला. एका शुक्रवारी ठरवले की आपण स्वयंपाक घरी बनवायचा. पोळ्यांचा मोठा प्रॉब्लेम. खाली मेस मध्ये सांगुन पोळ्यांची सोय केली. एकटा एकटा स्वयंपाक बनवुन एकटा एकटा जेवेल तो देशस्थ कसला? मस्तपैकी निमंत्रण दिले केळकर, गणेश, जोशी, आगाशे ही सगळी पोस्ट बॅचलर गॅंग. ह्यांना बोलावले.सगळ्यांसाठी फ्रुट ज्युस, जेवण झाल्यावर आईस्क्रीम. अन् मग मी जय्यत तयारीला लागलो. पहिल्यांदा ह्या सगळ्यांना बोलावल्यावर त्यांना देखील अंदाज नव्हता की जेवण म्हणजे नेमके हा करणार काय आहे. त्यामुळे सगळे जण कुतुहला पोटी आले.
दोघा चौघांना सलाड कापायच्या कामाला, मेस मधुन सांगितलेल्या पोळ्या आणायला सांगितले. एक जण उशीरा आला तर त्याला “शेवेच्या भाजीच्या रस्स्याचा” सुगंध आला आणि भुकेजला बिचारा जठराग्नी अजून प्रदीप्त झाला.
ज्युस प्यायचा मुड कोणाचाच नाही, सगळे म्हणू लागले यार, सरळ जेवणावर ताव मारु. असा मसाला रस्स्याचा सुगंध घेऊन देखील कितीतरी दिवस झाले. बढिया कोणीतरी टेबलवर जेवणाची पानं सजवली, जेवता जेवता पाण्याऐवजी ज्युस चे ग्लास भरले. सगळ्यांनी आपापले पाने वाढुन घेतली आणि वदनी कवळ ची वाट न पाहता “कुरू” जेवणावर अक्षरशः तुटून पडले. कोणाला तिखट रस्स्याने चेह-यावर घाम येतोय तर कोणाच्या कोणाच्या कानामागुन घाम वाहतोय, कोणी रुमालाने घाम पुसतोय तर कोणी रुमालाने नाक पुसतोय. बोलण्याला सगळे चिडीचूप पण हाता तोंडाच्या गाठीसोबत चेह-याला घामाच्या धारा अन् नाकाला पाण्याच्या. पण सगळे तृप्त शेवटला भात घेताना भानावर आले आणि मग शेवटी शेवटी जेवणाच्या अखेर थोड्या थोड्या आमच्या गप्पा सुरू झाल्यात. भातावर पण सगळ्यांनी मस्तपैकी रस्सा ओतून घेतला आणि शेवटला रस्सा भात चवीचवीने मनापासून खात,अन्नाने भरल्या भांड्यांचा खडखडाट करीत, ह्या पहिल्या वहिल्या जेवणाची सांगता केली. जेवणानंतर मस्तपैकी पाहिजे तितके आईस्क्रीम खाल्ले आणि असा हा पोटभर जेवणाचा तृप्त सोहळा संपन्न झाला.
जेवण संपल्यावर सगळ्यांची प्रतिक्रिया एकच्…..आज पहिल्यांदा वाटते आहे की विदेशात पोटभरून जेवलो असे.
दुस-या शुक्रवारी परत सगळ्यांना बोलाविले. मात्र आजचा बेत तिखट वगैरे न ठेवता, “पनीर बटर मसाला” भारतीय स्टाईल. आले सगळे पण ह्यावेळी केळकर ज्युस ची पाच लिटर ची कॅन घेऊन आला. एक जण आईस्क्रीम घेऊन आला. दुसरा शुक्रवार पण सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केली. सगळ्यांनी पोटभरभरून जेवले आणि आठवड्याभराची कसर, एका दिवसात काढून घेतली.
आता आमचा चौघा पाच जणांचा कंपु मेस मध्ये सुद्धा आनंदाने जेवत असे. कारण एक गोष्ट सगळ्यांना नक्की कळलेली की सहा दिवस अळणी मेसचे एक शुक्रवार आपला वार.
आज शुक्रवार ची दुपार जोशी चा फोन आला अरे संध्याकाळी मी “बेसनाचे चिले” करतोय. तू बाकी काही प्लॅन ठरवू नकोस. मी म्हटले ठीक आहे. केळकर म्हणाला ज्युस मी आणतोय, गणेश म्हणाला मी आईस्क्रीम आणतोय, आगाशे म्हणाला मी फ्रुट सॅलड आणतोय. अरे ! म्हटलं चाललय काय? मात्र आमचे संस्कारच् असे की सगळ्यांनी थोडा थोडा खारीचा वाटा उचलायचा आणि सेतू पुर्ण करायचा.
जोशी ने लसुण घालून बेसनाचे चिले अप्रतिम बनविले. चटणी चिले खाण्यात तर काही औरच् मजा होती. आता आमची पण शुक्रवारची मेस एकदम फार्मात चाललेली. आणि SIEMENS च्या मेस ची पण गोडी लागलेली. कारण सहा दिवस मिळमिळीत गिळल्यानंतर एक दिवस जीभेचे चोचले पुरवले जात होते. आता मिळमिळ मेस देखील सुसह्य होत होती.
इकडे आमच्या शुक्रवारच्या मेस ची ख्याती – हाता तोंडाची गाठ आणि रुमालानी घाम – फेमस झालेली. आजुबाजुचे फ्लॅट रहिवासी, कार्यालयातील मित्र मंडळी हळूहळू आम्हाला पण बोलवा म्हणून आग्रह करायला लागली.
सहा दिवस शास्त्रोक्त आहार घेणारे सर्व मित्र गण एक दिवस तरी जीभेचे चोचले पुरवले जावे ह्यासाठी तडफडत होते.
भारतीय शाकपाक पद्धती ही जगातील सर्वात आधुनिक म्हणण्यास कसलीच् हरकत नाही. आमचे आहारशास्त्र हे पण सांगते तेलयुक्त पदार्थांबरोबर आम्ही पोळी म्हणजे फायबर खातो. लिंबू सुद्धा तेलाच्या दुष्परिणामांना शह देणारा हुकमी एक्का. चव म्हणाल तर जीभेचे चोचले पुरवणा-या पदार्थांची खाण. मसाले म्हणाल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे.
बाहेर देशात अरबी मसाले मिळमिळीत, पाश्चात्य जीवनशैलीचे जेवण आपण दोन दिवसाचे वर जेवूच् शकत नाही. माझा एक मित्र जर्मनी मध्ये उकडलेल्या भाज्या खाऊन खाऊन वैतागलेला. जर्मनी च्या लोकांची आहार पद्धती म्हणजे त्यांना लहानपणापासूनच उकडलेले मांस, भाज्या त्यावर मिरे पूड, मीठ नावाला चिली पावडर / फ्लेक्स हा आहार बालपणापासून दिल्या गेलेला. त्यामुळे ही मंडळी उकडल्या आहारावर पोट भरभरून जगत असतात. आपल्याला बालपणी जे अन्न दिले जाते. तत्सम अन्न मिळाल्याशिवाय आपले पोट भरत नाही म्हणण्यापेक्षा जेवल्याचे समाधान मिळत नाही. असा माझा अनुभव आहे. बरे, जेवणात मसाले वगैरे बाकी काही नसल्याने त्यांची शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा फारशी सुदृढ नसते. पण अशाच् जेवणाने जर्मन लोकांचे पोट भरते. मात्र भारतीय चव ह्यांना खुप भावते. एकदा दुपारी लंच सुरू असताना. आमच्या CKP मॅडमने रस्स्यातली मासोळी आणली. आमचा जर्मन मॅनेजर, त्याला अन्नाचा सुगंध आला. त्याने अर्धी पोळी आणि थोडी मासोळी दे म्हणून विनंती केली. आपल्या जेवणातला भरपूर हिस्सा द्यायचा ही आपली भारतीय संस्कृती. मॅडमने दोन पोळ्या आणि भरपूर मासोळी त्याला दिली. चट्क चट्क दोन मिनिटात त्याने चवीने चटकावल्या आणि very tasty very tasty म्हणत आशाळभूत नजरेने अजुन मिळते का! कानोसा घेत होता. अर्थात नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर हा जर्मन मॅनेजर, आपले भारतीय पदार्थ खाण्यासाठी हटकून थांबायचा आणि भारतीय व्यंजनांचा स्वाद घ्यायचा.
भारतीय पद्धतीचे जेवण आहारशास्त्र जीवन पुरक, जीवन पोषक, रोगमुक्त ठेवणारे आणि परिपूर्ण आहे.
आमचा एक मलेशियन खादाड मोटु मित्र – दोन दिवसात मेसच्या जेवणाला कंटाळलेला. जेवण झाल्यावर मेसच्या मागील परिसरात जायचे, सावलीत उभे राहायचे, तोंडात सिगरेट शिलगवायची,नाका तोंडातून धूर काढत काढत अल्जेरियाच्या रेताड वाळवंटाला शिव्या घालायच्या अन् वर मेस च्या जेवणाला दे पेल जमतील तेवढ्या शिव्या घालायच्या. असा साधारण आठवडाभर त्याचा शिरस्ता चाललेला. हा खवय्या मेसच्या जेवणाच्या चवीला प्रचंड वैतागलेला.
एक दिवस मोटु मित्र पाठीवर भली मोठी हॅवरसॅक भरलेली घेवून आला. कॅंपच्या रस्त्यात पायी भेटला. विचारले मोट्या काय आहे रे आत? म्हणाला आता आम्ही मलेशियन मित्र मंडळी आमचे जेवण तयार करणार अन् पोटभर जेवणार. सालं कमवायचं पोटासाठी आणि पोटालाच् रिकाम ठेवायचं. आपल्याला तर नाही पटंत असं म्हणत सिगारेटच्या धुराची वलयं सोडत खळखळून हसला.
मलेशियन लोकं आमच्या कंपुतले सगळे मांसाहारी. मात्र मला बोलवायचे तर ग्रेव्ही वेगळी ठेवून त्याची भाजी माझ्यासाठी मुद्दाम वेगळी काढून ठेवीत असंत.पहिल्यांदा मला, त्यांनी जेवायला बोलावले आणि पहिल्या घासाला डोळे डबडब, नाकातून पाणी आणि कानातून वाफा. जीभ हॉ हॉ….. फुसफुस……हॉ हॉ…..फुसफुस….. पण भाजी अतिशय चवदार. मी मस्त तशाही स्थितीत जेवत होतो. जेवण संपता संपता पोट तुडुंब अन् रुमाल ओलाचिंब. अबे मोट्या काय ओतलं बे रस्स्यात???? त्यांचे सगळे मसाले आपल्या भारतीय पद्धतीचे. ग्रेव्ही किंवा रस्सा बनविण्याची पद्धत आपल्यासारखी. मात्र तिखट हे लोकं खुप करतात. मोटु म्हणाला “माझा मुलगा तीन वर्षाचा आहे. त्याला इतकी तिखट भाजी मिळाली नाही तर तो जेवत नाही.” आता कळले ह्याचा Quality Control चा Chief पाईल्सच्या गोळ्या वयाच्या अडतीस वर्षांपासून का घेतोय? आता मोटु चा तीन वर्षाचा मुलगा पण पस्तिसाव्या वर्षांपासून पाईल्स पाईल्स म्हणून कोकलणार पण तिखट रस्सेदार लजीज अन्न जीभेचे चोचले कायम ठेवत खाणार.
तुम्ही कुठल्याही भिन्न देशाच्या मेस मध्ये जेवण असाल तर एक दिवस आपल्या लहानपणी जी सवय आहे, तत्सम अन्न आठवड्यातून एकदा निश्चित घेत जा. आणि तृप्त पोटावर हात फिरवत पानावरून उठा.
मन प्रसन्न राहील आणि सुटीच्या शेवटल्या दिवसाची ओढ पण राहिल.

भाई देवघरे

Leave a Reply