संपादकीय संवाद – मराठीची दैना थांबविण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांनी पुढे यावे

मराठी भाषेची सर्वात जास्त दैना महाराष्ट्रातच झाली आहे, असा आरोप ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केला आहे. नाशिकमध्ये जनस्थान पुरस्कार स्वीकारतांना त्यांनी हे मत मांडले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडणे तर साहजिकच आहे.
कर्णिकांच्या या विधानातील तथ्यही नाकारता येणार नाही. मात्र याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारल्यास समस्त मराठी माणूस असेच उत्तर द्यावे लागेल. आपण काही कामाने केरळ, आंध्र, तामिळनाडू किंवा कर्नाटकात गेलो आणि रस्त्यावरील कोणत्याही नागरिकाला हिंदी किंवा इंग्रजीत प्रश्न विचारला तर तो त्याच्या मातृभाषेतच उत्तर देतो, महाराष्ट्रात मात्र आम्हला मराठी बोलण्याची लाज वाटते, आम्ही मराठी प्रश्नालाही इंग्रजीत किंवा हिंदीत उत्तर देतो.
महाराष्ट्राने आजवर कायम सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेले आहे, इथे चंद्रपूर गडचिरोलीतून आंध्रातील नागरिक येतात, तर गोंदिया भंडाऱ्यातून छत्तीसगडी येतात बुलढाण्यात मध्यप्रदेशातील लोक येतात तर सांगली सातारा, कोल्हापूर कडे कर्नाटकी बांधव महाराष्ट्रात येतात. मुंबई ने तर उभ्या देशाला सामावून घेतले आहे. या सर्वांच्या भाषा आमच्याकडे बोलल्या जातात त्यात आम्ही मायबोलीला विसरलो आहोत.
आमच्याकडे आज शिक्षणातही मराठीवर अन्यायच आहे, बहुतेक मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात. मंत्रालयातील कारभार सनदी अधिकारी चालवतात तेही मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांच असतात. त्यांना मराठीबद्दल प्रेम का वाटावे? त्यामुळे मराठीची दैना होणे स्वाभाविक आहे.
मराठीच्या उत्थानासाठी राज्य सरकारने विविध मांडले गठीत केली आहेत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे त्यातील एक आहे, मधू मंगेश कर्णिक त्याचे अध्यक्ष होते, अमराठी अधिकाऱ्यांमुळे त्यांना किती मर्यादा आल्या होत्या हे मधुभाई खासगीत सांगतील. २००८ मध्ये मराठी दिवाळी अंकांची १०० वर्ष पूर्ण होत होती. मराठी दिवाळी अंकांना एक वेगळी परंपरा आहे, त्यावेळी मधुभाईच अध्यक्ष होते, त्यावर्षी राज्य सरकारने दिवाळी अंकांची स्पर्धा ठेवली त्या स्पर्धेची अधिकाऱ्यांमुळे कशी वाट लागली हा इतिहास मराठी माणूस विसरलेला नाही.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता, मराठीची दैना होते हे वास्तव नाकारता येणार नाही मात्र, ती थांबवण्यसाठी मराठी माणसालाच पुढाकार घ्यावा लागेल. यासाठी मधुभाईंसारख्या मान्यवर साहित्यिकांनी पुढे यावे हे पंचनामाचे त्यांना आवाहन आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply