बकुळीची फुलं – शुभांगी भडभडे

आत्ता पर्यंत माझी प्रकाशित ७७ पुस्तकं आहेत,त्यात ४५ कादंब-या आहेत. आणि त्यातल्या २३ कादंब-या ह्या महापुरुषांच्या जीवनावर आहेत. त्या २३ कादंबरीचं, ” शेवटचं पान” मी लिहिलं. रसिक वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
माझ्या आयुष्यात वळणा वळणावर अनेक माणसं मला भेटलीत, ज्यांनी मनात मुद्रा उमटवली आणि ज्यांचा आदर्श मी मनात ठेवला. अशी २७ “भेटलेली माणसं” मी लिहीलीत. महापुरुषांच्या जीवनावर लेख मी लिहिले. त्यालाही रसिक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या सर्वांची मी ऋणी आहे .
असं म्हणतात , जितकी प्रसिद्धी जास्त तितके हितशत्रू अधिक . पण लक्षात आलं हा वाक्प्रचार तितकासा बरोबर नाही . कारण रसिक वाचकांनी हातचं राखून स्नेह केला नाही, तर भरभरून स्नेहाचं दान मला दिलंय . मी त्या रसिक वाचकांची ऋणी आहे .
आयुष्यात वळणा वळणावर अनेक प्रसंग घडले . कधी गप्पांत ते अनेकांना सांगितले . कधी प्रवासातले असतील , कधी आठवणी असतील. कधी माहिती असेल , पण मी सांगत राहिले.
बकुळ वृक्षाखाली फुलांची धरतीवर इतस्ततः पखरण झालेली असते . तशी ती प्राजक्ताचीही असतेअशीच पखरण , परंतु ती फुलं मोहक , सुगंधित असली तरी क्षणजीवी असतात .
बकुळ फुलांचं तसं नसतं . दीर्घकाळ मनाच्या कुपीत ठेवलेली ही फुलं सुगंधित असतात . तशाच गंधित माझ्या आठवणी.
मला अनेक प्रकाशकांनी आत्मचरित्र लिहायला सांगितलं, परंतु साधंसुधं जीवन जगणारी मी गृहिणी लेखिका , इतर सर्वांच्या सारखं माझं आयुष्य आहे . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आलेली आर्थिक संकटं इतरा प्रमाणे माझ्याही वाट्याला आली पण त्यात खंत नव्हती , होता तो आनंद , पुरवून , जपून खाण्याचा . आणि होता बाणेदारपणा , दुस-या पुढे हात न पसरण्याचा . होते संस्कार कथांचे , वाचनाचे, आदर्श व्यक्तींचे.
नव्हता हट्ट , स्वभाव होता जमवून घेण्याचा.
शाळेत छडी खाण्यानी अपमान होत नव्हता . कंपास नाही म्हणून वर्गाबाहेर काढण्याची शिक्षा नविन नव्हती.
खेळही खर्चाचे नव्हते. मुलं सायकलचे टायर चालवण्याची शर्यत लावत , भोवरा खेळत , पतंग उडवत . मुली लपंडाव, लगोरी , टिक्कर बिल्ला खेळत . कश्शाची कश्शाची म्हणून लाज नव्हती . खरंच खूप सुंदर होते बालपण.
सागराच्या लहरी आल्यावर पावला खालची वाळू घसरुन जावी, हातातला पारा घरंगळत जावा, ओंजळीतलं पाणी झिरपून जावं तसं सहजच निघून गेलेत ते दिवस .
आता बालपणाच्या गावाला जाता येणार नाही . पण
बकुळीची फुलं पुस्तकात ठेवावीत , त्याचा सुगंध यावा , कधीतरी जुन्या वहीतून मोरपीस अलगद् बाहेर यावं आणि मन नकळत त्या वयातल्या आठवणीत रेंगाळत रहावं, कुणाला तरी सांगितल्या चैन पडू नये . असे हे गंधित क्षण .
अनेक समस्या आल्यात पण कधी विद्रोही वृत्ती मनात जागीच झाली नाही . सारं , सा-याच स्थितीत प्रसन्न असावं हे देवानीच दिलेलं वरदान आहे.
आता दर रविवारी मी आपल्या भेटीला येईन . गंधित बकुळीची फुलं घेऊन .
आवडतील तुम्हाला . मागाल मला तुम्ही .. देईनही मी . कारण ते सारे गंधित क्षण तुम्ही सर्वांनी दिलेत मला.
खरं ना ?

शुभांगी भडभडे

Leave a Reply