संपादकीय संवाद – राजू शेट्टींचे निरर्थक आकांडतांडव

विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या १२ जागांवर महाविकास आघाडीने केलेल्या शिफारसीनुसार राज्यपालांनी नियुक्त्या कराव्या असा आग्रह धरण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते परवा राज्यपालांना भेटून आले. मुख्यमंत्र्यांनी ही नावे ६ नोव्हेंबर रोजीच राज्यपालांकडे पाठवली होती, मात्र कोणती नावे पाठवली हे मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले नाही आणि आपल्याकडे कोणती नावे आली हे राज्यपालांनीही सांगितली नाही. असे असले तरी माध्यमांमधून वेगवेगळी नावे जाहीर झाली असून त्या नावांवर सडतात्याने चर्चा होत असतात.
परवा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कालपासून त्या यादीतील दोन नावे कापल्या गेली अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यात एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे. अर्थात याबाबतीत अधिकृत माहिती काहीही नाही. सर्वकाही सांगीवांगीच आहे, असे म्हटले तरी चालेल. तरीही राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर आपला संताप जाहीर केला आहे.
एकूणच हा प्रकार बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी असा असल्याचे जाणवते आहे. मुळात मुख्यमंत्र्यांनी कोणती नावे पाठवली, हे कुणालाही माहित नाही. त्यांनी जर शेट्टींना सांगितले असेल आणि नाव प्रत्यक्षात दुसरेच पाठवले असेल, तरीही सांगता येत नाही. त्याचप्रमाणे कोणती नावे बदलणार हेदेखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे कुठे सांगितले नाही मग ते नाव गाळले असे कसे म्हणता येईल? राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पाठवण्यात आले होते, ही बाब लक्षात घेता राजू शेट्टींचे नाव कापले हे पक्षप्रमुख शरद पवार किंवा मग प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तरी जाहीर करायला हवे होते, मात्र यांच्यापैकी कुणीही तोंड उघडलेले नाही, तरीही राजू शेट्टी यांनी पवारांवर आगपाखड करावी हे काहीसे न पटणारे आहे.
मात्र राजकारणात असेच होत असते, यालाच राजकारण असे म्हणतात. आता खरोखरी राजू शेट्टींचे नाव जर पवारांनी कापले असेल तर त्यांच्याशी ती धोकेबाजी झाली असे म्हणता येईल. तसेही शरद पवार धोकाबाजी करण्यात एक्स्पर्ट म्हणूनच ओळखले जातात, त्यामुळेच धोकेबाजी झाल्याची शंका नाकारता येत नाही. यात खरे काय ते सर्वांसमोर यायला हवे. अन्यथा ही निरर्थक आगपाखड अशीच सुरु राहील. यावर सर्वच संबंधितांनी विचार करायला हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply